उचलला सामाजिक उत्तरदायित्वाचा विडा
भंडारा : मानव धर्म हा सर्वात मोठा धर्म समजला जातो. त्यातही दया व आपुलकी या दोन बाबी वाखाणण्याजोग्या असतात. अशीच सामाजिक बांधिलकी व उत्तरदायित्व निभावलेली माणसं आज कोरोना महामारीत आपुलकीने मदतीचा हात देत असल्याचे समोर येत आहे. भंडारा शहराला लागून असलेल्या गणेशपूर येथील आदर्श युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी संकटकाळात गरजू व गरीब लोकांसाठी अन्नाची सोय केली आहे. गत दहा दिवसांपासून हा चमू सातत्याने या गरिबांचे अन्नदाते म्हणून सामाजिक उत्तरदायित्व प्रामाणिकपणे निभावित आहेत.
कोरोना संकट काळात माणुसकी हरपत चालल्याचा अनुभव दररोज घडत व दिसून येत आहे. अनेकांची मानसिक व आर्थिक घडी विस्कटली आहे. दिवसा कमविणे व सायंकाळी पानावर खाणे, अशी स्थिती निर्माण केली आहे. अनेकांवर दोन वेळचे अन्न खायला पैसे नाहीत. अशा स्थितीत दवाखान्यात जाण्याची वेळ आली तर हातात पैसा नाही. औषध उपचार शासकीय खर्चाने होत असले तरी अन्नाची सोय होत नाही. रूग्णाला अन्न मिळत असले तरी त्यांच्या नातेवाइकांची गैरसोय होत असते. अशा परिस्थितीत शिवभोजन थाळीनेही आधार दिला. मात्र त्यातही परिसीमा बांधली असल्याने कुणाकडे हात पसरावे अशी स्थिती दिसून आली. ही करूण परिस्थिती आदर्श युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी हेरली. सामाजिक उत्तरदायित्व व बांधिलकीचा प्रत्यय देत या उमद्या तरुणांनी गरजू व गरीब लोकांना अन्नदान करण्याचा निर्णय घेतला. तब्बल दहा दिवसांपासून या मंचचा चमू इमानेइतबारे जिल्हा सामान्य रुग्णालयासह अन्य खाजगी रुग्णालयात बाहेर किंवा सार्वजनिक स्थळी उपाशीपोटी व गरजू लोकांना अन्न पाकिटाचे वाटप करीत आहे. या कार्यासाठी ते कुठलाही मोबदला घेत नाही. समाजात अशी कर्तृत्ववान व दानशूर व्यक्तींची गरज खऱ्या अर्थाने निर्माण झाली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून या तरुणांनी समाजासमोर एक आदर्श स्थापित केला आहे. या उपक्रमात आदर्श युवा मंचचे अध्यक्ष पवन मस्के, लुकेश जोध, सौरभ साखरकर, संजू मते, मोनू शेंडे, प्रणव मांढरे,चेतन जोध, सचिन साखरकर, मयूर कुथे व इतर सहकारी सहकार्य करीत आहेत.