अन् गुराख्याने काठीच्या सहाय्याने पळवून लावला वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2023 18:42 IST2023-03-27T18:42:32+5:302023-03-27T18:42:56+5:30
Nagpur News जनावरे घेऊन चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने अकस्मात हल्ला केला. यात गुराख्याने प्रसंगावधान दाखवित काठीच्या सहाय्याने वाघाला पळवून लावले.

अन् गुराख्याने काठीच्या सहाय्याने पळवून लावला वाघ
भंडारा : जनावरे घेऊन चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने अकस्मात हल्ला केला. यात गुराख्याने प्रसंगावधान दाखवित काठीच्या सहाय्याने वाघाला पळवून लावले. ही घटना नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र हद्दीत येणाऱ्या आसलपानी येथे सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. यात मात्र दिलीप चव्हाण (५२) हे जखमी झाले.
मोहाडी तालुक्यानंतर तुमसर तालुक्यात वाघाने धुमाकुळ घातला आहे. विशेष करुन नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या आसलपानी गावात वाघाचे दर्शन होत असते. जंगलामध्ये नेहमीप्रमाणे गुराखी दिलीप चव्हाण हे जनावरे घेऊन चराईसाठी गेले होते. याचवेळी दबा धरुन बसलेले पट्टेदार वाघाने पाठीमागून त्यांच्यावर हल्ला चढविला. यात त्यांच्या गळ्यावर वाघाच्या पंजाचे व्रण उमटले. मात्र प्रसंगावधान दाखवित चव्हाण यांनी हातातील काठीचा दम वाघाला भरला. थोड्यावेळासाठी दिलेरी दाखविल्याने वाघाने तिथून पळ काढला. घटनेची माहिती गावात पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली. चव्हाण यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली होती.
सध्या शेतशिवारात धानपिक लावले आहे. शेतकरी रात्री बेरात्री शेतात जात असतात. परंतु वाघाचा गावसीमेवर शिरकाव होत असल्याने शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. गत काही महिन्यांपासून तुमसर व मोहाडी तालुक्यात वाघाच्या हालचाली वाढल्या आहेत.
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात पट्टेदार वाघाचा संचार आहे. परिणामी या जंगल परिसरात गुराख्यांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु या सुचनेकडे दुर्लक्ष करीत असल्याने अशा घटना घडत आहेत.
-मनोज मोहिते, वनपरिक्षेत्राधिकारी, नाकाडोंगरी