अन् तिच्या मृत्यूने भावंडं झाली अनाथ
By Admin | Updated: April 19, 2016 00:30 IST2016-04-19T00:30:32+5:302016-04-19T00:30:32+5:30
जीवनात वेळ आणि काळ या दोन गोष्टी एकत्र आल्यास कोणावर कोणता प्रसंग ओढवेल हे सांगायची गरज नाही.

अन् तिच्या मृत्यूने भावंडं झाली अनाथ
समाजमन गहिवरले : गरज दानशुरांच्या मदतीची
गिरीधर चारमोडे मासळ
जीवनात वेळ आणि काळ या दोन गोष्टी एकत्र आल्यास कोणावर कोणता प्रसंग ओढवेल हे सांगायची गरज नाही. काळ कोणावर केव्हा वक्रदृष्टी घालेल हे सांगता येत नाही. असाच काळाने क्रूर खेळ दोन निरागस भावंडाच्या जन्मदात्रीसोबत केला. स्थानिक आंबेडकर वॉर्डातील सीमा श्रीकृष्ण बनकर (२९) हिचा अचानक झोपेतच मृत्यू झाला आणि तिचे दोन्ही मुले क्षणात अनाथ झाली. पाषाणालाही पाझर फुटावा, अशी ही घटना सध्या पंचक्रोशीत चर्चेत आहे.
सीमा श्रीकृष्ण बनकर ही पोटच्या दोन मुलांना घेऊन, घरात अठराविश्व दारिद्रय असताना, त्यांच्या भविष्याचे स्वप्न रंगवत जगत होती. श्रेयश श्रीकृष्ण बनकर (४ वर्षे) व तेजस श्रीकृष्ण बनकर (दीड वर्ष) अशी तिची ही दोन मुले. लहान मुल पोटात असतानाच पतीचे आकस्मिक निधन झाले.
पितृछाया गेल्यामुळे, मोलमजुरी करून, मोठ्या धैर्याने तिने संसाराचा गाडा पुढे नेत मुलांना मोठे केले. विधवा असूनही तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. सासु सासरे केव्हाचेच हे जग सोडून गेले होते. आता तिच एक तिच्या मुलांचा आधारवड म्हणून जगत होती. परंतु नियतीला ही गोष्ट मान्य नव्हती.
काल रोजच्या प्रमाणे कामावरून आली. बाजुच्याच शिंप्याकडे ब्लाऊज शिवायला दिले होेते. रात्री जेवनानंतर शेजारील नाजुक रणभीड माटे या महिलेशी गप्पा केल्या व नंतर दोन्ही मुलांना घेवून झोपी गेली. पण पहाटेच तिची प्राणज्योत मावळली. मनमिळावू स्वभावाची सीमा अचानक, काहीच प्रकृतीचा कारण नसताना निघून गेली.
तिची दोन्ही मुले क्षणातच अनाथ झाली. तिच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असतानाच त्या अनाथ झालेल्या भावंडाचे आता काय, असा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडावर येत होता. अगदी दोन वर्षात अचानक पती पत्नीच्या अकाली मृत्युमुळे श्रेयस व तेजस या निष्पाप मुलांवरचे मातृपितृ छत्र हरवल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
जवळचा कोणीच नातेवाईक नसल्याने दोन्ही भावंडाचा आता पालन पोषण कोण करणार असा जेव्हा प्रश्न विचारला गेला, तेव्हा शेजारील नाजुक रणभीड माटे, या महिलेने या दोन भावंडांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्याचे धाडस दाखविले.
पण जीवन हे लहान नाही. त्या मुलांवरील छत्र हरपल्याने त्यांचा उदरनिर्वाहा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, केवळ तिच्या जाण्याने आता गरज आहे ती समाजातील दानशूर म्हणविणाऱ्या खऱ्या दानशुरांची, योग्य संगोपनाची व निष्पाप मुलांच्या पुनर्वसनाची गरज आहे. एका व्यक्तीची मदत पुरेशी ठरणार नाही तर समाजातील प्रत्येक घटकाचा हातभार लागल्याशिवाय पर्याय नाही.