साहित्य खरेदीपूर्वीच काढली बँकेतून रक्कम

By Admin | Updated: May 20, 2017 00:59 IST2017-05-20T00:59:56+5:302017-05-20T00:59:56+5:30

लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहडी) येथील अंगणवाडी केंद्रासाठी साहित्याची खरेदी करावयाच्या नावावर समिती अध्यक्ष व सचिवांनी

Amount withdrawn from the bank before the purchase of the material | साहित्य खरेदीपूर्वीच काढली बँकेतून रक्कम

साहित्य खरेदीपूर्वीच काढली बँकेतून रक्कम

अंगणवाडीतील प्रकार : वर्षभरापासून रक्कम सेविकेकडे,
चौकशी अहवालात पर्यवेक्षिकांनी ठरविले दोषी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहडी) येथील अंगणवाडी केंद्रासाठी साहित्याची खरेदी करावयाच्या नावावर समिती अध्यक्ष व सचिवांनी बँकेतून रक्कम काढली. मात्र, ६,२०७ रूपयांची खरेदी करून उर्वरित रक्कम सुमारे वर्षभरापासून अंगणवाडी सेविकेने स्वत:जवळ ठेवल्याची गंभीर बाब उघडकीस आली. याप्रकरणी महिला व बालकल्याण विभागाच्या पर्यवेक्षिका डोंगरे यांनी चौकशी केली. यात अंगणवाडी सेविका दोषी आढळून आल्याचा अहवाल त्यांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिला आहे.
लाखनी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या रेंगेपार (कोहडी) येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक २ मध्ये हा प्रकार घडला आहे. विनायक मुंगमोडे यांच्या तक्रारीवरून हा प्रकार उघडकीस आला आहे. ग्राम आरोग्य व पोषण समितीचे अध्यक्ष तथा सरपंच अनिता शहारे व सचिव तथा अंगणवाडी सेविका चंद्रभागा टेंभूर्णे यांच्यावर मुंगमोडे यांनी आरोप लावला होता. आरोपाच्या अनुशंगाने चौकशी अहवाल तयार करण्यात आला असून आता दोषींवर काय कारवाई होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
मुंगमोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अंगणवाडी केंद्र २ च्या सेविका चंद्रभागा टेंभूर्णे व सरपंच अनिता शहारे यांनी हा प्रकार केल्याचा आरोप लावला आहे. ग्राम आरोग्य व पोषण समितीमधील रक्कम संगनमत करून कोणत्याही प्रकारची सभा व ठराव पारित न करता बँक खात्यातून परस्पर २२ हजार रूपयांची रक्कम काढली.
समिती अध्यक्ष तथा सरपंच अनिता शहारे व अंगणवाडी सेविका चंद्रभागा टेंभूर्णे यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे बँक खाते लाखनी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत आहे. खात्याचे पूनर्गठण करण्यात आले तेव्हा बँकेत २२ हजार ७३२ रूपये शिल्लक होती. त्यानंतर साहित्य खरेदी करण्यापूर्वीच अध्यक्ष व सचिव यांनी बँक खात्यातून ३० मार्च २०१६ ला २२ हजार रूपये काढले. त्यातून केवळ ६ हजार २०७ रूपयांच्या खर्चातून साहित्य खरेदी केले. उर्वरित १५ हजार ७९३ या रक्कमेतून साहित्य खरेदी केली नाही. व ती अंगणवाडी सेविका यांनी सुमारे वर्षभर स्वत:जवळ ठेवून त्यांनी ४ मे २०१७ ला बँक खात्यात जमा केल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
अंगणवाडी केंद्रात अत्यावश्यक असलेल्या साहित्य खरेदीबाबत सभा बोलाविण्यात आली. मात्र त्यात साहित्य खरेदी केल्यानंतरच रक्कम काढायची असे ठरलेले असतानाही अध्यक्ष व सचिवांनी कर्तव्यात कसूर करून साहित्य खरेदीपूर्वीच रक्कम काढली. २२ आॅगस्ट २०१६ ला सभा घेण्यात आली. त्यात साहित्य खरेदी केल्याच्या खर्चाचा ठराव घेण्यात आला नाही. त्यानंतर सभेची नोटीस काढली. परंतु सभाच घेतली नाही. त्यानंतर २५ एप्रिल २०१७ सभा घेण्यात आली.
या प्रकरणाची तक्रार महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आली. तक्रारीच्या अनुशंगाने पिंपळगांवच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका डोंगरे यांनी रेंगेपार येथील अंगणवाडीत सर्व कागदपत्रांची चौकशी केली असता, त्याता आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार डोंगरे यांनी चौकशी अहवाल तयार केला असून आता यातील दोषींवर काय कारवाई होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

सरपंचांवर होईल कारवाई
या प्रकरणात ग्राम आरोग्य व पोषण समिती अध्यक्ष तथा सरपंच अनिता शहारे यांनी पदाचा दुरूपयोग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार कार्यवाहीस पात्र आहे. सरपंच यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी महिला व बालविकास अधिकारी यांच्या माध्यमातून पंचायत विभागाकडे तसा अहवाल पाठविण्यात येईल.

अंगणवाडी केंद्र क्रमांक १ च्या सेविका सुशिला धारणे यांचे सहकार्य लाभले नसल्याने साहित्य खरेदी रखडली. ६ हजार २०७ रूपयांची खरेदी करण्यात आली. उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा केली आहे.
- चंद्रभागा टेंभूर्णे, अंगणवाडी सेविका
कॅशबुक व व्हाऊचर रजिस्टर अंगणवाडी सेविका चंद्रभागा टेंभूर्णे यांना दिले असता ते त्यांनी घेतले नाही. कार्यालयाच्या पत्रानुसार, ते अंगणवाडी पर्यवेक्षिका डोंगरे यांच्याकडे जमा करण्यात आलेले आहे.
- सुशिला धारणे, अंगणवाडी सेविका
साहित्य खरेदीसाठी २२ हजार रूपये बँकेतून काढले. त्यातून ६ हजार २०७ रूपयांची साहित्य खरेदी केली. अंगणवाडी सेविका धारणे यांची प्रकृती बरी नसल्याने साहित्य खरेदी करण्यात आली नाही.
-अनिता शहारे, सरपंच तथा समिती अध्यक्ष
जमाखर्च नोंदवहित आर्थिक व्यवहाराची नोंद न करता उर्वरित रक्कम स्वत:जवळ ठेवली. तसेच वर्षातून केवळ दोन सभा घेतली असून उर्वरित रक्कमेतून साहित्य खरेदीबाबत कार्यवाही केलेली नाही. त्यांच्याकडून वित्तीय अनियमितता तसेच कर्तव्यात कसून केला आहे. यात समिती अध्यक्ष व सचिव या दोषी आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचे शासन निर्णय १२ एप्रिल २०१७ नुसार कार्यवाहीस पात्र आहे.
- आर. ए. डोंगरे, अंगणवाडी पर्यवेक्षिका, पिंपळगांव
पर्यवेक्षिका डोंगरे यांनी चौकशी अहवाल दिलेला आहे. अहवालानुसार दोषी अंगणवाडी सेविकांवर कार्यवाही व्हावी, यासाठी तो अहवाल जिल्हा परिषद महिला व बालकल्याण अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आलेला आहे.
- उमेश खाकसे, विस्तार अधिकारी, ए.बा.वि.लाखनी

 

Web Title: Amount withdrawn from the bank before the purchase of the material

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.