राष्ट्रसंतांच्या संदेशसाठी ‘अमरनाथ’वारी
By Admin | Updated: June 8, 2016 00:28 IST2016-06-08T00:28:25+5:302016-06-08T00:28:25+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या भजनातून भारतीयांना एकतेचा संदेश दिला. धर्मा-धर्मात भेदभाव निर्माण होवून दंगे भडकते.

राष्ट्रसंतांच्या संदेशसाठी ‘अमरनाथ’वारी
आंधळगावचे किरण सातपुते दुचाकीने रवाना
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे
भंडारा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या भजनातून भारतीयांना एकतेचा संदेश दिला. धर्मा-धर्मात भेदभाव निर्माण होवून दंगे भडकते. त्यामुळे भारताची अस्मिता धोक्यात आली आहे. भारतीप्रती सर्वांमध्ये एकतेचे बीजारोपण व्हावे, व देशात शांतता नांदावी यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ओजस्वी वाणीतून निघालेल्या भजनाने प्रेरित झालेला मोहाडी तालुक्यातील आंधळगांव येथील किरण सातपुते हे भारताच्या अखंडतेसाठी दुचाकीनेच जनजागृती करीत बाबा बर्फानीच्या अमरनाथ यात्रेसाठी निघाले आहे.
आपली वाणी आणि लेखणी, शक्ती आणि भक्ती यांचे सर्व सामर्थ्य एकवटून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामाजिक जागृतीचे आणि प्रगतीचे प्रयत्न सातत्याने केले. आपल्या देशातील झोपी गेलेली खेडी जागी व्हावीत, अज्ञान, लोकभ्रम आणि सामाजिक निष्क्रियता यामुळे ग्रामीण जीवनाची झालेली दुर्दशा नाहीशी व्हावी, तिथल्या समाजाची सुधारणा व्हावी व सुखी जीवनाच्या दृष्टीने वाटचाल व्हावी, ग्रामस्थांच्या आयुष्यात चैतन्य निर्माण व्हावे यासाठी त्यांनी कार्य केले. सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने भाग्यशाली असलेला हा देश शिक्षण, आरोग्य आणि धनधान्य याही बाबतीत तितकाच वैभवशाली का नाही या विचाराने संत तुकडोजी महाराजांचे मन सदैव तळमळत असे.
सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक, सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला. तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली.महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनाद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसं अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.
देशातले तरूण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून केला. ग्रामगीतेचं वाचन खेडोपाडी मोठ्या आदराने केलं गलं. आजही केलं जातं. प्रासादिक भाषा, लोककल्याणाची तळतळ, खरं आणि समाजहितकारक ते सांगण्याइतका स्पष्टपणा या साऱ्याच पैलूंचं सुरेख दर्शन ग्रामगीतामध्ये होतं. तुकडोजी महाराजांना पुढे राष्ट्रसंत म्हणून गौरविले गेले. पण त्याहीपूर्वी ते ग्रामीण भागातल्या सामान्यजनांच्या मनीमानसी कधीच जाऊन बसले होते. याचे कारण त्यांच्या जीवनामधील अंधाराला मागे हटवून प्रकाशाची सोनेरी आश्वासक किरणे आणण्यासाठीच त्यांनी आपली सारं आयुष्य वेचलं होतं.
अशा या राष्ट्रसंतांनी, सामाजिक ऐक्यासाठी देशाला संदेश दिला. त्यांनी खंजेरी भजनातून, ‘माणूस द्या मज माणूस द्या’ असा संदेश दिला. या संदेशाने प्रेरित होवून राष्ट्रसंतांचे विचार प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहचविण्यासाठी आंधळगांव येथील किरण सातपुते यांनी आजपासून बाबा अमरनाथ यात्रेला प्रारंभ केला आहे. किरण सातपुते यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी, राष्ट्रसंतांचे विचार व पाण्याची बचत संदेशसाठी अमरनाथ यात्रा करीत असल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)