विषय समितीचे खाते वाटप

By Admin | Updated: August 11, 2015 00:43 IST2015-08-11T00:43:31+5:302015-08-11T00:43:31+5:30

जिल्हा परिषदेच्या नविनियुक्त सदस्यांची पहिली सर्वसाधारण सभा आज सोमवारला पार पडली.

Allocation of Subject Committee accounts | विषय समितीचे खाते वाटप

विषय समितीचे खाते वाटप

जिल्हा परिषद : शिक्षण व अर्थ - डोंगरे, बांधकाम व आरोग्य - बुरडे तर कृषी व पशुसंवर्धन - डहारे
भंडारा : जिल्हा परिषदेच्या नविनियुक्त सदस्यांची पहिली सर्वसाधारण सभा आज सोमवारला पार पडली. यात विविध खाते वाटप करण्यात आले. यात शिक्षण व अर्थ खाते उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांना, कृषी व पशुसंवर्धन खाते नरेश डहारे यांना तर बांधकाम व आरोग्य खाते विनायक बुरडे यांना देण्यात आले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी दोन सभापतिपद आले असले तरी महत्त्वपूर्ण शिक्षण व अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:कडे खेचून काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.
५२ सदस्यीय जिल्हा परिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी करुन सत्ता स्थापन केली. मात्र, सभापतिपदावरून दोन्ही पक्षात घुमजाव दिसून येत होता. सत्तेत असतानाही दोन्ही पक्षांनी महत्त्वपूर्ण खात्यांवर नजर ठेवून होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला एकच सभापतिपद देण्यासंबंधी प्रस्ताव ठेवला होता. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये सभापतिपदावरून अंतर्गत कलगीतुरा सुरु होता.
आज सोमवारला खाते वाटपासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिरोलकर या होत्या. यावेळी खातेवाटपात कुणाला झुकते माप मिळते त्याकडे सदस्यांच्या नजरा लागलेल्या होत्या. त्यात महत्वपूर्ण शिक्षण व अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडे खेचून आणले. हे पद डोंगरे यांच्याकडे सोपविण्यात आले. सोबतच राष्ट्रवादीचे नरेश डहारे यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली. काँग्रेसचे विनायक बुरडे यांना बांधकाम व आरोग्य समितीची जबाबदारी देण्यात आली आहे.
जलसंधारण व स्थायी समिती हे पदसिद्ध खाते अध्यक्षांकडे येत असल्यामुळे हे खाते जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्याकडे आहेत. यापूर्वी झालेल्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतिपदी राकाँच्या शुभांगी रहांगडाले यांची तर समाज कल्याण समितीच्या सभापतिपदी काँग्रेसचे नीळकंठ टेकाम यांची वर्णी लागली होती. जिल्हा परिषदेतील सहा पदांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी तीन पदे आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Allocation of Subject Committee accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.