सारेकाही फुटपाथवर!

By Admin | Updated: February 24, 2015 01:42 IST2015-02-24T01:42:41+5:302015-02-24T01:42:41+5:30

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आणि शहरातील कोणत्याही रस्त्याने

All on the sidewalk! | सारेकाही फुटपाथवर!

सारेकाही फुटपाथवर!

भंडारा : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आणि शहरातील कोणत्याही रस्त्याने गेले की व्यावसायिक अतिक्रमणांनी घातलेला विळखा निदर्शनास येतो. १५ हजार रुपयांपर्यंतच्या सोफासेटपासून ते महागड्या खेळण्यांपर्यंत सारेकाही फुटपाथवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. एरव्ही पोटची खळगी भरण्यासाठी फुटपाथवर चहाची टपरी चालविणाऱ्याला पालिकेचा अतिक्रमण विभाग सुखाने जगू देत नाही. दुसरीकडे मात्र हजारो रुपयांचा माल रस्त्याच्या कडेला फुटपाथवर ठेवून उघडपणे विकला जात असताना अतिक्रमण विभागाचे याकडे लक्ष कसे जात नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भंडारा शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त व्हावेत यासाठी जिल्हा प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला काही प्रमाणात यश आले. मात्र, ही मोहीम आता बंद पङली आहे. सध्या शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर व्यावसायिक अतिक्रमणांचा बोलबाला आहे. बसस्थानक मार्गावर दुतर्फा विक्रेत्यांची गर्दी पाहायला मिळते.
राष्ट्रीय महामार्गावर विश्रामभवनासमोर सोफासेट, आलमारी, टेबल, बांबूपासून तयार केलेले फर्निचर, चिनीमातीपासून तयार केलेल्या सजावटीच्या वस्तू, काचेचे झुंबर, गृहोपयोगी वस्तू सर्वकाही रस्त्याच्या कडेला विकले जात आहे. शोरूमपेक्षा काहीशी स्वस्त दरात या वस्तू मिळत असल्यामुळे ग्राहकही येथून खरेदी करीत आहेत.
पहाटे ट्रकने येतो माल
रस्त्याच्या कडेला लागलेल्या या दुकानांमध्ये महागड्या वस्तू विकल्या जातात. एक व्यक्ती २४ तास या दुकानात असते. ती रात्री या मालाजवळच फुटपाथवर झोपते. दिवसभरात विकलेल्या मालाचा मालकाला आढावा दिला जातो. त्यानंतर आवश्यक असलेला माल पहाटे ट्रकमध्ये टाकून विक्रीच्या ठिकाणापर्यंत पोहोचविला जातो. (प्रतिनिधी)
वाहतुकीचे तीनतेरा
४रस्त्याच्या कडेला लागणाऱ्या या मोठमोठ्या दुकानांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नागरिक या वस्तू पाहण्यासाठी, खरेदी करण्यासाठी रस्त्याच्या कडेला लागलेल्या या दुकानांमध्ये गर्दी करतात. स्वत:ची वाहने रस्त्यावर उभी करतात. यामुळे रस्त्याने जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.
वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष
४रस्त्याच्या कडेला मोठमोठी दुकाने लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस कारवाई करू शकतात. मात्र, वाहतूक पोलिसही याकडे लक्ष देताना दिसत नाहीत. पालिकेच्या अतिक्रमण विभागासह वाहतूक पोलिसही या अतिक्रमणांचा मलिदा खात नाही ना, असा संशय यानिमित्ताने येऊ लागला आहे.

Web Title: All on the sidewalk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.