सर्वच राष्ट्रीय पक्षांनी धोका दिला
By Admin | Updated: August 28, 2016 00:13 IST2016-08-28T00:13:33+5:302016-08-28T00:13:33+5:30
विदर्भाच्या मुद्यावर सर्वच राजकीय पक्षांनी वैदर्भीय जनतेची दिशाभूल केली. सत्तेत असताना काँग्रेसने धोका दिला ...

सर्वच राष्ट्रीय पक्षांनी धोका दिला
श्रीहरी अणे यांचा आरोप : तुमसरात जाहीर सभा
तुमसर : विदर्भाच्या मुद्यावर सर्वच राजकीय पक्षांनी वैदर्भीय जनतेची दिशाभूल केली. सत्तेत असताना काँग्रेसने धोका दिला आणि सत्ता मिळविण्यासाठी भाजपने दिशाभूल केली, असा आरोप राज्याचे माजी महाधिवक्ता अॅड.श्रीहरी अणे यांनी केला.
यावेळी मंचावर विदर्भ आघाडीचे संयोजक गोविंद कोडवाणी, माजी नगराध्यक्ष गिता कोंडेवार, नरेंद्र पालांदूरकर, लालू हिसारिया, शांडील्य उपस्थित होते. विदर्भाच्या मागणीसाठी जनजागृती करण्यासाठी अॅड.अणे यांची आज शनिवारला सिहोरा व तुमसर येथे जाहीर सभा झाली. या सभेत ते बोलत होते. यावेळी अॅड. अणे म्हणाले, विदर्भात मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. महाऔष्णिक वीज केंद्र आहेत. परंतु रोजगाराच्या संधी नाहीत. वीजेचे उत्पादन विदर्भात होते. आणि विजेचा लाभ पश्चिम महाराष्ट्राला मिळतो. आणि आपणाला भारनियमनाचा विळखा सहन करावा लागतो. भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा नदी वाहते. गोसेखुर्द, बावनथडी प्रकल्प आहे. हा जिल्हा धान उत्पादक जिल्हा आहे. त्यामुळे सिंचनात हा जिल्हा सक्षम असण्याची गरज आहे. परंतु या जिल्ह्यातील शेतकरी सधन तर नाहीच तर कर्जाच्या खाईत अडकला आहे. त्यामुळे आता हा अन्याय आणखी किती दिवस सहन करायचा, असे सांगून आता सर्र्वानी एक झाले पाहिजे. गटातटाचे राजकारण सोडून विदर्भाच्या मागणीसाठी आपण सर्वांनी एक झालो पाहिजे, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी विदर्भ समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)