साकोलीत सर्वच उमेदवारांची ‘हवा टाईट’
By Admin | Updated: October 9, 2014 22:57 IST2014-10-09T22:57:38+5:302014-10-09T22:57:38+5:30
जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रापैकी साकोलीतील निवडणूक काहींना प्रतिष्ठेची, काहींना अस्तित्वाची तर काहींना भूतकाळातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

साकोलीत सर्वच उमेदवारांची ‘हवा टाईट’
भंडारा : जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रापैकी साकोलीतील निवडणूक काहींना प्रतिष्ठेची, काहींना अस्तित्वाची तर काहींना भूतकाळातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षांनी जातीय समिकरणासोबतच महात्मा गांधींजीच्या छायाचित्रांचा आधार घेतला आहे. आजघडीला येथील निवडणूक सर्वच उमेदवारांसाठी प्रचंड तापदायक ठरणारी आहे.
साकोली विधानसभा क्षेत्रात कुणबी समाजाचे प्राबल्य असले तरी हा समाज पोटजातीत विखुरला आहे. या समाजातून सर्वाधिक उमेदवारांनी मैदानात उडी घेतली आहे. यात काहींच्या मागे नेते नाहीत तर काहींनी फोडाफोडीच्या राजकारणावर भर देत आहेत. साकोली विधानसभा क्षेत्रात तेली, कुणबी, अनुसूचित जाती, कोहळी, आदिवासी, भोईढिवर, माळी समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे उमेदवारही यावेळी रिंगणात आहेत. त्या-त्या भागात त्यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे मतांचे विभाजन ठरले आहे.
याशिवाय पोवार, कलार आणि अल्पसंख्यक समाजाचे प्रतिनिधी रिंगणात नसल्यामुळे प्रमुख उमेदवारांनी या समाजातील प्रत्येक गटांना भेटून मतांचा जोगवा मागत आहेत. प्रत्येकांना स्वत:चा समाज प्रिय असतो. त्यामुळे रिंगणात नसलेल्या समाजाने कुणाला मते द्यायची, हे अद्याप ठरविलेले नाही. परिणामी उमेदवारांची दमछाक होत आहे.
रिंगणातील उमेदवार मात्र हा समाज आपल्याकडे आहे, याकडे लक्ष केंद्रीत करीत असला तरी यापूर्वी या ना त्या पदावर असलेल्या या मंडळीने नागरिकांना धुत्कारल्याचा प्रत्यय मतदारांना येत आहे. त्यामुळे कुणी कितीही दावा केला तरी या समाजाच्या मतांचे विभाजन होणार आहे. त्यामुळे आजघडीला कुणाकडे कोण आहेत, हे ठरविणे, चुकीचे ठरणार आहे.
स्वयंघोषित नेतेही सरसावले
पाच वर्षातून एकदाच निवडणुका येत असल्यामुळे आपली पोळी शेकून घेण्यासाठी आतापर्यंत कधीही न दिसणारे अनेक स्वयंघोषित नेते साकोली क्षेत्रातील दिग्गज उमेदवारांकडे मान‘धना’साठी हाथ पसरवित आहेत. प्रत्येकचजण मी या गटाचा प्रमुख आहे, माझ्याकडे ईतकी मते आहेत, असे सांगून सकाळीच त्या-त्या उमेदवारांच्या दारावर गर्दी करीत आहेत. परंतु प्रत्यक्षात त्यांच्याकडे किती लोक आहेत, याची खडानखडा माहिती त्या उमेदवारांकडे आहे. परंतु निवडणुकीच्या या रणधुमाळीत कुणाला नाराज करणे परवडणारे नसल्यामुळे ताकावर परत पाठवित आहेत. काहींनी नामांकन दाखल करुन ईकडून तिकडे उड्या मारत असून आतापर्यंत अनेक पक्षात प्रवेश केला आहे. आता मी तुमच्यासोबत आहे, असे सांगत फिरत आहेत. (प्रतिनिधी)