पाण्याच्या बॉटलमधून दारुचे पार्सल

By Admin | Updated: September 1, 2016 00:43 IST2016-09-01T00:43:20+5:302016-09-01T00:43:20+5:30

दारु पिणाऱ्याला व विकणाऱ्याला शंभर मार्ग आहेत, असे नेहमी बोलल्या जाते. ती सत्यता भंडारा तालुक्यातील संगम या गावात पाहायला मिळत आहे.

Alcohol parcels in the water bottle | पाण्याच्या बॉटलमधून दारुचे पार्सल

पाण्याच्या बॉटलमधून दारुचे पार्सल

संगम गावातील प्रकार : छुप्या मार्गाने दारुचा गोरखधंदा
भंडारा : दारु पिणाऱ्याला व विकणाऱ्याला शंभर मार्ग आहेत, असे नेहमी बोलल्या जाते. ती सत्यता भंडारा तालुक्यातील संगम या गावात पाहायला मिळत आहे. छुप्या मार्गाने दारुची अवैध विक्री पाण्याच्या बॉटलमधून होत आहे. पोळा सण असल्याने दारु विक्रीला उधाण येणार असल्याच्या चर्चेने जोर चढला आहे.
भंडारा मुख्यालयापासून ५ कि.मी. अंतरावर संगम (पुनर्वसन) हे प्रकल्पबाधीत गाव आहे. या गावात हातभट्टीवरील मोहफुलाची दारु मिळते. तशी गावोगावी दारु विक्रीची दुकाने आहेत. मात्र संगम येथे परिसरातील दारुड्यांची येथे जत्रा भरत असते.
विशेष म्हणजे गुरुवार व शुक्रवार पोळ्याचा सण असल्याने दारुड्यांची चौकाचौकात नेहमीप्रमाणे गर्दी राहणार आहे. यात लाखो रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येथे बेला, मुजबी, दवडीपार, शहापूर, फुलमोगरा, पिपरी, कवडसी, भोजापूर, जाख, उमरी आदी परिसरातील दारुडे येथे येत असतात. त्यामुळे गावातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
दुसरीकडे गावात दारुचे वाढते प्रमाण व दारु पिणाऱ्यांचा येणारा लोंढा पाहून गावातील दारु विक्रेते सज्ज झाले आहेत. दारुची कमतरता भासू नये याची पुरेपुर खबरदारी मागील आठ दिवसांपासून दारु विक्रेत्यांनी घेतली आहे. मोठ्या प्रमाणात दारुचा साठा जमविल्याची चर्चा आहे.
दारुची बॉटल सहज ओळखता येत असल्याने पाण्याच्या एक लिटर बॉटलमधून दारुची विक्री करण्याची शक्कलही येथे लढविण्यात आली आहे. जवळपास ५०० लोकसंख्या असलेल्या या गावात दारुच्या अवैध व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस प्रशासन यावर लक्ष केंद्रीत करणार काय? हा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Alcohol parcels in the water bottle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.