अक्षय तृतीयाच्या विवाह मुहूर्ताला कोरोना संचारबंदीमुळे विरजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:37 IST2021-05-11T04:37:59+5:302021-05-11T04:37:59+5:30
अक्षय तृतीयाचा मुहूर्तावर खरेदीसह अनेक शुभ कामे केली जातात. लग्न सोहळा तर अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर करण्यासाठी अनेकांची धडपड असते. ...

अक्षय तृतीयाच्या विवाह मुहूर्ताला कोरोना संचारबंदीमुळे विरजन
अक्षय तृतीयाचा मुहूर्तावर खरेदीसह अनेक शुभ कामे केली जातात. लग्न सोहळा तर अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर करण्यासाठी अनेकांची धडपड असते. मात्र यावर्षी कोरोना संकटाने सर्व काही ठप्प केले आहे. विवाह सोहळेही रद्द करण्याची वेळ आणली आहे. भंडारा येथील हेमंत सेलिब्रेशनचे हेमंत वाघमारे म्हणाले, दोन वर्षापूर्वीपर्यंत अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर धूमधडाक्यात लग्न होत होते. बुकिंगसाठी चढाओढ दिसत होती. परंतु गतवर्षीपासून कोरोना संकटाने बुकिंग अगदी कमी झाली. त्यात अनेकांनी घरगुती लग्नसोहळे पार पाडले. यावर्षी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तासाठी हेमंत सेलिब्रेशनकडे चार लग्नाचे बुकिंग होते. दोन सकाळी आणि दोन संध्याकाळी सोहळे पार पाडणार होते. महिनाभरापूर्वी बुकिंग झाले होते. परंतु कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला. शासनाने संचारबंदी लागू केली. त्यामुळे चारही लग्न रद्द करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे येथे ७ जूनपर्यंत असलेले लग्नाचे सर्व बुकिंग रद्द करण्यात आले.
खरबी (नाका) येथील स्वीट ॲन्ड लव्ह सेलिब्रेशनमध्ये सहा वर्षात अक्षय तृतीयाच्या मुहूर्ताला लग्न झाले नाही, असे घडले नाही. गत वर्षीही कोरोना संसर्गातही एक लग्न सोहळा अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर पार पडला होता. यावर्षी अक्षय तृतीयाच्या दिवशी सहा परिवारांना चौकशी केली. त्यापैकी दोन सोहळे बुकही झाले होते. परंतु कोरोनाच्या उद्रेकाने या दोन्ही परिवारांनी सध्या लग्न नको म्हणून बुकींग रद्द केल्याची माहिती संचालक विकी गिरीपुंजे यांनी दिली.
तुमसरचे तहसीलदार बाळासाहेब तेढे यांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नासाठी यंदा परवानगी दिली नाही. एक लग्नसोहळा ३ मे रोजी पार पडला आणि एक १३ मे रोजी आयोजित आहे, असे सांगितले. साकोलीचे तहसीलदार रमेश कुंभरे म्हणाले आमच्याकडे अर्ज आले होते. परंतु अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लग्नासाठी कुणाचेही अर्ज घेतले नाही. त्यामुळे मंजुरीचा प्रश्न नाही. नागरिकांनी विनापरवानगी घरगुती पद्धतीने लग्न केले तर ते स्वत: जबाबदार राहतील आणि त्यांच्यावर प्रशासन कारवाई करेल, असे त्यांनी सांगितले. लाखांदूर येथील आशीर्वाद मंगल कार्यालयाचे सचिन खरकटे म्हणाले, मे महिन्यात बुकींग आली नाही. अक्षयतृतीयेला लग्न करण्याच्या आनंदावर कोरोनाने विरजन घातले. घरगुती पद्धतीने लग्न करणेही अनेकांनी पुढे ढकलले आहे.
बॉक्स
२५ वऱ्हाडी आणि दोन तासात लग्न कसे शक्य
गतवर्षी कोरोना संसर्गात लग्नासाठी ५० पाहुण्यांना परवानगी होती. तसेच विवाहासाठी वेळेचे कोणतेही बंधन नव्हते. परतु यावर्षी शासनाने २५ पाहुणे आणि दोन तासात लग्न आटोपण्याची अट घातली. २५ पाहुण्यात लग्न एकदाचे होईलही परंतु दोन तासात लग्न कसे शक्य आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या जाचक अटीपेक्षा कोरोना संसर्ग संपल्यानंतर धूमधडाक्यात लग्न करण्याचा निर्णय अनेक परिवारांनी घेतला. त्यामुळेच उन्हाळ्यातील लग्नसोहळे रद्द झाल्याचे दिसत आहे.