जिल्ह्याला ७ लक्ष ६८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
By Admin | Updated: May 25, 2017 00:17 IST2017-05-25T00:17:02+5:302017-05-25T00:17:02+5:30
शासनाने सन २०१७ ते २०१९ या कालावधीत ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

जिल्ह्याला ७ लक्ष ६८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
जिल्हाधिकारी : महामार्गावर वृक्ष लागवडीवर भर देण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासनाने सन २०१७ ते २०१९ या कालावधीत ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षी जिल्ह्याकरिता १ जुलै ते ७ जुलै २०१७ या कालावधी ७ लक्ष ६८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आज पत्रपरिषदेत दिली. यावेळी उपवनसंरक्षक उमेश वर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर व सामाजिक वनीकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
जागतिक स्तरावर उष्णतेत सातत्याने होत असलेली वाढ, हवामान व ऋतूबद्दल, अवकाळी पाऊस, दुष्काळ तसेच दुर्भिक्ष यावर मात करण्यासाठी व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण हा एकमेव पर्याय आहे. ही बाब जागतिकस्तरावर मान्य झाली आहे. वातावरणी कॉर्बनडाय आॅक्साईड शोषून नैसर्गिक प्रक्रियेने आॅक्सीजन उत्पन्न करणारे एकमेव यंत्र म्हणजे वृक्ष तथापि असंतुलीत विकासासाठी निर्वणीकरण व वृक्षतोडीमुळे वृक्षाच्छादनाचे प्रमाण कमीहोत चाललेले आहे. यासाठी भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने १ जुलै २०१७ रोजी राज्यभर वृक्ष लागवड योजना हाती घेतली असून राज्यात एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात वृक्ष लावण्याचा कार्यक्रम होणार आहे. भंडारा जिल्हा प्रशासन व वनविभागाने यासाठी खास मोहिम हाती घेतली असून भंडारा जिल्ह्यात ७ लक्ष ६८ हजार वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्यात सध्या २० टक्के वनक्षेत्र असून ते राष्ट्रीय वन नितीनुसार ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा शासनाचा मानस आहे. यावर्षी म्हणजेच २०१७ ला ४ कोटी, २०१८ ला १३ कोटी आणि २०१९ ला ३३ कोटी असे तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचा राज्याच्या वनविभागाचा मानस आहे.
जिल्ह्यातील सर्व कामांची माहिती स्थळ, छायाचित्र आणि रोप लावण्यासाठी केलेल्या खड्ड्यांच्या अक्षांश रेखांशसह आॅनलाईन स्वरुपात वन विभागाच्या संकेतस्थळावर भरायचे आहे. मोहिम पारदर्शीपणे राबविण्याबाबत सुनिश्चिती करण्यासाठी रोपवन स्थळ, रोपवाटिका स्थळ तसेच लावण्यात येणाऱ्या रोपाची स्थिती आॅनलाईन पद्धतीने संनियंत्रीत केली जात आहे. यासाठी संकेतस्थळावर वनयुक्त शिवारच्या लिंकवर याबाबतची माहिती उपलब्ध आहे.
अधिकारी व कर्मचारी यांना ग्रीन आर्मीचे सदस्य बनवून प्रत्येकांना ५ वृक्ष लावण्यास व त्याचे संगोपन करण्या सांगण्यात आले आहे. तसेच ४ थी ते ९ वी च्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ग्रीन आर्मीचे सदस्य बनवून त्यांना वृक्ष लावून तीन वर्ष त्यांचे संगोपन करण्याचे उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्तम विद्यार्थ्यांना बक्षिस व शालेय संस्थांना सुद्धा बक्षिस देण्याची योजना आखण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
ग्रीन आर्मीमध्ये आतापर्यंत ५१३१८ सदस्यांची नोंदणी करण्यात आल्याचे उपवसंरक्षक उमेश वर्मा यांनी सांगितले. माटोरा येथे खासदारांच्या हस्ते वृक्षारोपण होणार असून रोप आपल्या दारी हा नवीन उपक्रम शासन राबविणार आहे. त्या अंतर्गत प्रत्येक व्यक्तीस ५ झाडे मोफत घरपोच मिळणार आहेत. तसेच उपवनसंरक्षक कार्यालयात आयटी सेल कार्यान्वित करण्यात आला असून यावर आॅनलाईन माहिती आपण भरू शकतो, असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमात सर्व जनतेनी तसेच सामाजिक संस्था यांच्यासह इतरही संस्था यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे व उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी केले.