मतदानात साकोली क्षेत्र पुढे; भंडारा मागे
By Admin | Updated: October 16, 2014 23:19 IST2014-10-16T23:19:14+5:302014-10-16T23:19:14+5:30
राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल बुधवारला शांततामय वातावरणात मतदान प्रक्रिया आटोपली. भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन क्षेत्रातील ५३ उमेदवारांचे

मतदानात साकोली क्षेत्र पुढे; भंडारा मागे
एकूण मतदान ७०.९७ टक्के
भंडारा : राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल बुधवारला शांततामय वातावरणात मतदान प्रक्रिया आटोपली. भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन क्षेत्रातील ५३ उमेदवारांचे भाग्य मशिनबंद झाले. या निवडणुकीत एकूण ६ लाख ५१ हजार २६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची अंतिम टक्केवारी ७०.९७ ईतकी आहे.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीतील मतदानापेक्षा यावेळी १.९५ टक्क्यांनी मतदान वाढले असून साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये ७३.७० टक्के सर्वाधिक तर भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये ६८.२२ टक्के कमी मतदान झाले. तुमसर क्षेत्रात ७१.४४ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया आटोपताच उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला असून आता सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे, ती रविार १९ आॅक्टोबरच्या मतमोजणीच्या दिवसाची. यादिवशी ५३ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. भंडारा जिल्ह्यात ९ लाख १७ हजार ६२२ मतदारसंख्या आहे.यापैकी पुरुष मतदारांची संख्या ४ लाख ६७ हजार ३५७ तर महिला मतदारांची संख्या ४ लक्ष ६७ हजार ३५७ इतकी आहे. यापैकी ३ लाख ३४ हजार ५१० पुरुष तर ३ लाख १६ हजार ७५६ महिलांनी मतदान केले. एकूण ६ लाख ५१ हजार २६६ मतदारांनी मतदान केले.
विधानसभानिहाय मतदान
तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये २ लाख १,१२२ (७१.४४ टक्के), भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये २ लाख ३२,२३८ (६८.२२ टक्के), साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये २ लाख १७,९०६ (७३.७० टक्के) मतदान झाले.
यापैकी साकोली मतदारसंघात ७३.७० टक्के इतके सर्वाधिक मतदान झाले असून भंडारा मतदारसंघात ६८.२२ टक्के कमी मतदान झाले आहे. या निवडणुकीत महिलांपेक्षा पुरुषांची टक्केवारी अधिक दिसून आली. पुरुषांची टक्केवारी ७१.५७ इतकी तर महिलांची टक्केवारी ७०.३५ इतकी आहे. मतदानाची प्रक्रिया आटोपल्यानंतर सर्व ईव्हीएम त्या-त्या क्षेत्रातील ‘स्ट्राँग रुम’ मध्ये ठेवण्यात आले आहे. या ‘स्ट्राँग रुम’ परिसरात शस्त्रधारी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, मागील २५ दिवसांपासून दिवसांपासून प्रचारात व्यस्त असलेले उमेदवार आता निवांत झाले आहेत. गावोगावी सभा, प्रचारांचा धुराळा, बैठका आदी कामाचा ताण निवळला असून कार्यकर्तेही सुस्तावले आहेत. आता कोणत्या उमेदवाराला किती मते मिळतील, कोण बाजी मारेल, याचीच शहरासह ग्रामिण भागात गोळाबेरीज करणे सुरु आहे. त्या आधारावर शर्यती लावण्याचे प्रमाण वाढले आहे. या शर्यती लाखोंच्या घरात असून मतदारांच्या नजरा आता रविवारच्या मतमोजणीकडे लागलेल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)