कृषी विभागाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: June 29, 2015 00:50 IST2015-06-29T00:50:20+5:302015-06-29T00:50:20+5:30
विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

कृषी विभागाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष
बळीराजा अडचणीत : मार्गदर्शनाची गरज
कोंढा (कोसरा) : विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मृद परीक्षण करण्याचे आवाहन करीत असताना जमिनीचा पोत सुधारण्यासाठी व शेतकऱ्यांनी कोणत्या जमिनीत कोणते पीक घ्यावे याची शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून माहिती मिळणे दुरापास्त झाले आहे.
पवनी तालुक्यातील शेतकरी योग्य उत्पादन घेऊ शकत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे कर्जाचे डोंगर वाढत चालले आहे. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचेही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे एक मुख्य कारण आहे.
जिल्ह्याच्या मुख्यालयी माती परीक्षण प्रयोगशाळा आहेत. शिवाय जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र आहेत. या ठिकाणीही माती परीक्षण करण्याची सोय करून देण्यात आली आहे. पण माती परीक्षण करण्याची सोय गाव व तालुकास्थळी नसल्याने अडचण जात आहे. माती परीक्षण करून पीक लागवड करण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञ देत असतात. पण माती परीक्षण करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहाय्य करीत नसल्याचा अनेक शेतकऱ्यांचा आरोप आहे. माती परीक्षण करावे लागते याचे ज्ञानच शेतकऱ्यांना माहीत नाही. सध्या शेतकरी रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. त्यामध्ये युरीया खताचा चौरास भागात सर्वात जास्त खत म्हणून वापर केल्याचे दिसून येते. युरिया खतामुळे खान पिकाची काडी वाढून येते व कंबरेमध्ये मोडते. तसेच युरियाच्या जास्त उपयोगामुळे मानवी शरीरावर जास्त परिणाम होत असते. अशावेळी कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळताना दिसत नाही. तालुका कृषी कार्यालय व मंडळ कार्यालये हे फक्त कागदी घोडे रंगविण्यात धन्यता मानत असल्याचे दिसते. सध्या धान शेती व इतर खरीप हंगाम चौरास भागात शेतकरी करीत आहे. कृषी विभागाने गावागावात जाऊन शेतकऱ्यांना प्रबोधन करणे आवश्यक आहे. (वर्ताहर)