कृषी सहायकांचा कामावर बहिष्कार
By Admin | Updated: February 16, 2016 00:47 IST2016-02-16T00:47:14+5:302016-02-16T00:47:14+5:30
कृषी सहायक संवर्गाच्या विविध अडचणी व मागण्यासंदर्भात कर्मचाऱ्यानी आंदोलनाच्या माध्यमातून एल्गार पुकारला आहे.

कृषी सहायकांचा कामावर बहिष्कार
मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
भंडारा : कृषी सहायक संवर्गाच्या विविध अडचणी व मागण्यासंदर्भात कर्मचाऱ्यानी आंदोलनाच्या माध्यमातून एल्गार पुकारला आहे. ९ फेब्रुवारीपासून सुरु झालेले आंदोलन ३ मार्चला साखळी उपोषणापर्यंत अविरत सुरु राहणार आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने वेळोवेळी शासनाला मागण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला. मात्र कृषी सहायकांच्या मागण्यांसबाबत बैठक घेण्यात आली नाही. परिणामी संघटनेने आंदोलन करण्याची भूमिका आखली. यात ९ ते १४ फेब्रुवारीपर्यंत सर्व कृषी सहायकांनी काळ्या फिती लावून कामकाज केले तर सोमवार (१५) पासून जलयुक्त शिवार कार्यक्रम, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना व इतर अकृषक कामावर बेमुदत बहिष्कार घालण्यात आला आहे.
२२ फेब्रुवारीला नागपूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच लेखणी बंद व योजनेवर बहिष्कार घालण्यात येणार आहे. १ मार्च ते ३ मार्च या कालावधीत पुणे येथे कृषी आयुक्त कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांची बहुतांश कामे रखडणार आहेत. (प्रतिनिधी)