बावनथडी नदीपात्रात शेती गडप
By Admin | Updated: December 3, 2014 22:44 IST2014-12-03T22:44:25+5:302014-12-03T22:44:25+5:30
बपेरा येथील शेतकऱ्यांची ८७ हेक्टर आर बागायती शेती बावनथडी नदीपात्रात गडप झाली आहे. या शेतकऱ्यांना अद्याप शासकीय मदत मिळाली नाही. यामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट आहे.

बावनथडी नदीपात्रात शेती गडप
शेतकऱ्यांमध्ये संताप : नुकसानभरपाई देण्याची शासनाकडे मागणी
चुल्हाड (सिहोरा) : बपेरा येथील शेतकऱ्यांची ८७ हेक्टर आर बागायती शेती बावनथडी नदीपात्रात गडप झाली आहे. या शेतकऱ्यांना अद्याप शासकीय मदत मिळाली नाही. यामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे.
अडीच हजार लोकवस्ती असलेल्या बपेरा गावात बहुतांश शेतकरी आहेत. बावनथडी नदी काठावर शेतकऱ्यांची बागायती शेती आहे. या शेतकऱ्यांना नदीचे वाढते पात्र कर्दनकाळ ठरत आहे. या नदीच्या पात्राने मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सिमा भागांची विभागणी केली आहे. आधी नाला स्वरूपात असलेला पात्राने नदीचे विशाल रूप घेतले आहे. नदीचे पात्र गावाच्या दिशेने वाढत आहे.
या वाढत्या पात्रात गावातील शेतकऱ्यांची ८७ हेक्टर आर बागायती शेती गिळंकृत झाली आहे. यात २० हुन अधिक विहीरी भुईसपाट झालेल्या आहेत. नदी काठालगत या विहिरीचे अवशेष आजही साक्ष देत आहे. गावातील शेतकऱ्यांवर वाढत्या पात्राने संकट ओढवले आहे. नदी पात्रात शेती समाविष्ठ झाल्याने अनेक शेतकरी शेतमजूर झालेली आहे. तर अनेकांना भूमिहीन होण्याची पाळी आली आहे. यामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांनी गावही सोडले आहेत. वडिलोपार्जीत शेती नदी पात्रात गिळंकृत झाल्याचे दु:ख गावातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहेत. या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या प्रयत्नात राजकारण झाले आहे.
तत्कालीन पालकमंत्री बंडू सावरबांधे यांनी गावातील शेतकऱ्यांना विहीरी देणार असल्याचे सांगितले होते. परंतु या विहीरी आजवर शेतकऱ्यांच्या शेतात पोहचल्या नाहीत. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी गावाला भेट दिली होती. परंतु शेतकऱ्यांना मदत वाटपाचा पॅकेज दिला नाही. त्यांनी गावातील नागरिकांच्या पुनर्वसनाला प्राधान्य दिले. १२५ कुटूंबियाचे पुनर्वसन झाले आहे. (वार्ताहर)