दोन वर्षांपासून मोहगाव नाल्यावरील कृषी बंधारा भग्नावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST2021-02-05T08:39:04+5:302021-02-05T08:39:04+5:30
करडी (पालोरा) : सन २००७ -०८मध्ये कृषी विभाग, मोहाडी यांच्याकडून मोहगाव नाल्यावर बांधण्यात आलेल्या दगडी बंधाऱ्याची आता दुरवस्था झाली ...

दोन वर्षांपासून मोहगाव नाल्यावरील कृषी बंधारा भग्नावस्थेत
करडी (पालोरा) : सन २००७ -०८मध्ये कृषी विभाग, मोहाडी यांच्याकडून मोहगाव नाल्यावर बांधण्यात आलेल्या दगडी बंधाऱ्याची आता दुरवस्था झाली आहे. गत दोन वर्षांपासून वारंवार मागणी करूनही हा बंधारा नव्याने उभारण्याकडे अथवा त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे शेतकरी जागेश्वर तितीरमारे व अन्य शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
मोहाडी तालुका कृषी विभागांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे दोन वर्षांपासून वारंवार बंधाऱ्याची दुरुस्ती अथवा नव्याने बंधारा बांधण्याची मागणी केली आहे. परंतु, प्रत्येकवेळी टाळाटाळ केली जात आहे. शेतावर जाऊन पाहणी करण्याचे सौजन्यही दाखविण्यात आलेले नाही. दोन वर्षांपासून पुराचे लोंढे मोठ्या प्रमाणात येत आहेत. बंधाऱ्याची एका बाजूची दगडी भिंतही कोसळली आहे. माती खरडून वाहून गेली असल्याने खोल पाट पडले आहे. बंधाऱ्याला पाणी अडविण्यासाठी लावलेल्या लाकडी पाट्याही चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे पाणी नावालाही साठत नाही. गेल्या दोन वर्षांपासून कोरडा दुष्काळ सहन करावा लागत आहे. यावर्षी तर शेतीतून ३० टक्केच उत्पादन मिळाल्याने लागवडीचा खर्चही निघालेला नाही. कृषी विभाग, मोहाडी मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे यांनी तातडीने याविषयीची कार्यवाही करताना बंधाऱ्याची दुरुस्ती करावी किंवा बंधारा नव्याने बांधावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
जि. प. ल. पाटबंधारे विभागाच्या दोन बंधाऱ्यांना भगदाड
जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या मौजा पाजरा व पालोरा नाल्यावरील दोन सिमेंट बंधाऱ्यांना भगदाड पडले आहे. चार महिन्यांपासून हे बंधारे दुरुस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. परंतु, अजूनही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी याची दखल घेतलेली नाही. या बंधाऱ्यांची पाहणी करण्याचे सौजन्यही दाखविण्यात आलेले नाही. पावसाळ्यात पाणी सरळ नदीच्या पात्रात वाहून जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये विभागाच्या अनास्थेविषयी नाराजीचा सूर आहे. या बंधाऱ्यांच्या कामाबाबत वरिष्ठांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
( छायाचित्रे मोहगाव नाल्यावरील बंधाऱ्याची आहेत.)