कृषी सहायकाने कोट्यवधी रूपये लुबाडले
By Admin | Updated: July 17, 2016 00:25 IST2016-07-17T00:25:53+5:302016-07-17T00:25:53+5:30
तिरोडा तालुक्यात प्रतिनियुक्तीवर आलेले गोरेगाव तालुका कृषी कार्यालयांतर्गत चोपा कृषी मंडळाच्या बोटे येथील....

कृषी सहायकाने कोट्यवधी रूपये लुबाडले
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग? : कृषी सहायक इलमे अपहार प्रकरण
काचेवानी : तिरोडा तालुक्यात प्रतिनियुक्तीवर आलेले गोरेगाव तालुका कृषी कार्यालयांतर्गत चोपा कृषी मंडळाच्या बोटे येथील कृषी सहायक नाना इलमे यांनी मुलांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी व अनेक बोगस कामे करून कोट्यवधी रूपये लुबाडले. आता या सहायकाला वाचविण्याचा प्रयत्न वरिष्ठ अधिकारी करीत असल्याची चर्चा आहे. याच कारणामुळे त्या कृषी सहायकाला रजेवर जाण्याचा सल्ला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आला.
कृषी सहायक नाना इलमे यांनी तिरोडा तालुक्यात जलयुक्त शिवार अभियान आणि एकात्मिक पाणलोट विकास अंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे केली. मात्र वास्तविक पाहता त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल व फसवणूक केली. इलमे यांनी मार्च ते जून २०१५ ची दैनंदिनी माहिती अधिकारात दिली. त्यात कामे सुरू होण्यापूर्वीच पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले. कोट्यवधींची कामे असताना महाराष्ट्र दर्शन व मुला-मुलींचे लग्न असताना कामावर उपस्थित असल्याचे दाखवले आहे.
चुकीची दैनंदिनी, अधिकाऱ्यांची दिशाभूल व फसवणुकीची तक्रार १२ मे २०१५ ला तालुका कृषी अधिकारी तिरोडा व गोरेगाव, मंडळ कृषी अधिकारी व पर्यवेक्षक गोरेगाव, उपविभागीय कृषी अधिकारी गोंदिया यांना करून चौकशी आणि पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. चोपाचे (गोरेगाव) मंडळ कृषी अधिकारी मेडे व पर्यवेक्षक यांनी त्यांच्या दैनंदिन कार्याला मंजुरी दिली. अर्थात त्यांनी केलेले शासकीय केलेले कार्य बरोबर असल्याचे मान्य केले. यासाठी आपण दैनंदिनी तपासली असता त्याचे पुरावे आपणाकडून देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. २० जून २०१५ ला माहितीच्या अधिकाराखाली दैनंदिनीनुसार कृषी सहायकाकडून माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. दिनांक ९ जून २०१६ अन्वये मंडळ कृषी अधिकारी चोपा (गोरेगाव) यांनी कृषी सहायक इलमे यांना २३ मे २०१६ ला पत्र देण्यात आले. मंडळ कृषी अधिकारी स्तरावर गुन्हा नोंदविता येत नसल्याचेही पत्राद्वारे सांगण्यात आले आहे. कार्यालय मंडळ कृषी अधिकारी चोपानुसार (दिनांक २८ जून २०१६) त्यांनी २० जून २०१६ ला माहिती व केलेल्या कारवाईचा अहवाल मागण्यात आला. मात्र मुद्दे क्रं.१ ते ८ ची वैयक्तीक माहिती देता येत नसल्याचे पत्र मंडळ कृषी अधिकारी मेडे यांनी दिले. (वार्ताहर)
वरिष्ठ अधिकाऱ्याकडून पाठराखण
कृषी सहायक इलमे यांच्या संपूर्ण खोट्या कार्यात, भ्रष्टाचारात वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याचे नाकारता येत नाही. तालुका कृषी अधिकारी तिरोड्याला प्रतिनियुक्तीवर कामाचा व्याप पाहता पाठवतो व त्या सहायकाची प्रवास रजा सवलत मंजूर करतो. मंडळ कृषी अधिकारी मेडे व पर्यवेक्षक कृषी सहायकाच्या घरी लग्न समारंभात जातात आणि कामावर असल्याची दैनंदिनी पास करतात. शासकीय कामांना कृषी सहायकाचे वैयक्तीक कामे सांगून दिशाभूल करतात अशी चर्चा आहे.