डीसीपीएसऐवजी जीपीएफ कपात करण्याचे मान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:36 IST2021-03-27T04:36:56+5:302021-03-27T04:36:56+5:30
भंडारा : शंभर टक्के अनुदानित शाळेवर १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षिकेला जुनी पेन्शन लागू असून, जीपीएफ खाते ...

डीसीपीएसऐवजी जीपीएफ कपात करण्याचे मान्य
भंडारा : शंभर टक्के अनुदानित शाळेवर १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षिकेला जुनी पेन्शन लागू असून, जीपीएफ खाते मिळाले. मात्र २००७ ला सेवासातत्य झाल्याने जीपीएफ लागू नसल्याचे पत्र माध्यमिक वेतन पथक अधीक्षक यांनी शाळेला देऊन जीपीएफ बंद करून डीसीपीएस कपातीचे आदेश दिले होते. याबाबत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने २४ मार्च रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन या शिक्षिकेची २४ ऑगस्ट २००४ ची नियुक्ती असल्यामुळे त्यांना जुनीच पेन्शन योजना लागू असल्याबाबत चर्चा केली. यात त्यांना जुनीच पेन्शन योजना लागू असून, डीसीपीएसऐवजी जीपीएफ कपात करण्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांना मान्य केले.
नूतन कन्या शाळा येथे २४ ऑगस्ट २००४ रोजी जयश्री केळवदे यांची शंभर टक्के अनुदानित शाळेवर प्रथम नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी तीन वर्षांचा शिक्षण सेवक कालावधी समाधानकारक पूर्ण केल्यामुळे २४ ऑगस्ट २००७ पासून त्यांना सेवेत कायम करण्यात आले असून, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची मान्यता आहे.
त्यांची प्रथम नियुक्ती १ नोव्हेंबर २००५ पूर्वीची असल्यामुळे त्यांना जीपीएफ खातेही मिळाले तसेच कपातही सुरू झाली. मात्र त्यांची २४ ऑगस्ट २००४ ची नियुक्ती असली, तरी त्यांना २४ ऑगस्ट २००७ पासून कायम मान्यता मिळाल्यामुळे त्यांना जुनी पेन्शन लागू नसून, त्यांची जीपीएफची कपात बंद करून डीसीपीएसची कपात सुरू करून पगार देयक सादर करण्याचे माध्यमिक वेतन पथक अधीक्षक यांनी दि. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी चुकीचे फर्मान काढले होते.
वेतन पथक अधीक्षक यांच्या चुकीच्या निर्णयामुळे या शिक्षिका जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने २४ मार्चरोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानुसार त्या शिक्षिकेची १ नोव्हेंबर २००५ पूर्वीची नियुक्ती असल्यामुळे त्यांना जुनीच पेन्शन योजना लागू असून, त्यांची जीपीएफची कपात करावी, असे वेतन पथक अधीक्षक यांना सांगितले. याशिवाय १ तारखेच्या नियमित वेतनाचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. याबाबत संघटनेने नाराजी व्यक्त करून जिल्हा कोषागार कार्यालयात मागील सहा महिन्यांत कधी वेतन देयके सादर केल्याच्या तारखासह माहितीची मागणी करण्यात आली.
यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, वेतन पथक अधीक्षक प्रतिभा मेश्राम, विमाशि संघांचे जिल्हाकार्यवाह राजेश धुर्वे, जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, कार्याध्यक्ष चंद्रशेखर रहांगडाले, विलास खोब्रागडे, धीरज बांते, दारासिंग चव्हाण आदी उपस्थित होते.
कोट
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी शंभर टक्के अनुदानित शाळेवर नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनीच पेन्शन लागू असल्याचे वेतन पथक अधीक्षक यांना माहिती नसणे, ही चिंताजनक बाब आहे.
राजेश धुर्वे, जिल्हा कार्यवाह
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, भंडारा.