कृषी सहायकांचे आंदोलन
By Admin | Updated: August 11, 2014 23:44 IST2014-08-11T23:44:32+5:302014-08-11T23:44:32+5:30
राज्य कृषी विभागातील महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. यात भंडारा जिल्ह्यातील १६५ कृषी सहायक

कृषी सहायकांचे आंदोलन
भंडारा : राज्य कृषी विभागातील महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. यात भंडारा जिल्ह्यातील १६५ कृषी सहायक सहभागी झाल्याने ऐन शेतीच्या हंगामात आंदोलन सुरू झाल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकण्याची चिन्ह दिसत आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ पुणेच्या माध्यमातून कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांच्या मागण्यांच्या संदर्भात मागील काही दिवसांपासून आंदोलने तथा निविदांच्या माध्यमातून सरकारला मागण्या सादर करण्यात येत आहे. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. कॅडर्र संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाने या मागण्या पूर्ण करण्याच्या संदर्भात सोमवारपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात कृषी विभागातील तांत्रिक संवर्ग कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी, महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग २, महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग १, अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी सहसंचालक, कृषी संचालक या संवर्गातील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.
कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील वेतन श्रेणी व दर्जावाढीबाबत मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, कृषी विभागातील काही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण करण्यासाठी घेतलेला निर्णय रद्द करावा, नैसर्गीक आपतकालीन परिस्थितीत शेतपिकाचे नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी सहकार विभागाच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, यासह १३ मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
यात भंडारा जिल्ह्यात कार्यरत १६५ कृषी सहायकांनी सहभाग घेतला आहे. सात दिवसात राज्य शासनाने मागण्यांच्या संदर्भात तोडगा काढला नाही तर बेमुदत संप व त्यानंतर मुंबई येथे आम उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाने दिला आहे. दरम्यान ऐन पावसाळ्यात शेतीचा खरीप हंगाम सुरू आहे.
या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून नेहमी मदत मिळते. त्यांच्या या आंदोलनाने शेतकऱ्यांना मदत किंवा शेतीविषयक माहिती मिळणार नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. (शहर प्रतिनिधी)