वय वर्षे ७४, मात्र वाहनाने कधी प्रवास केला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:21 IST2021-07-23T04:21:55+5:302021-07-23T04:21:55+5:30
लाखांदूर : वेगवान युगात वाहनाशिवाय घराबाहेर पडणेही कठीण. कुठेही जायचे असेल तर दुचाकी, चारचाकी वाहनाचा आधार हवाच. माेठ्या प्रवासासाठी ...

वय वर्षे ७४, मात्र वाहनाने कधी प्रवास केला नाही
लाखांदूर : वेगवान युगात वाहनाशिवाय घराबाहेर पडणेही कठीण. कुठेही जायचे असेल तर दुचाकी, चारचाकी वाहनाचा आधार हवाच. माेठ्या प्रवासासाठी रेल्वे आणि विमानसेवाही आहे. परंतु अख्ख्या आयुष्यात कुणी वाहनात पायच ठेवला नाही असे सांगितले तर आश्चर्य वाटेल ना! मात्र हे खरे आहे. लाखांदूर तालुक्यातील ७४ वर्षीय आनंदराव खाेब्रागडे यांनी आजपर्यंत कधीही वाहनाने प्रवास केला नाही. कुठेही जायचे असले की त्यांची पायी वारी ठरलेली असते. हीच त्यांची परिसरात ओळख आहे. वेगवान युगातील आनंदराव म्हणजे अजब व्यक्तिमत्त्वच म्हणावे लागेल.
लाखांदूर तालुक्यातील साेनी गावात आनंदराव यांचा जन्म झाला. अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांच्या आई-वडिलांनी कुटुंबाचा गाडा हाकीत त्यांना माेठे केले. समज येताच परिस्थितीची जाणीव झाल्याने त्यांनी आई-वडिलांना मदत करणे सुरू केले. कधी शेतात तर कधी माेलमजुरीचे काम करू लागले. लहान वयात उन्हाळ्यात दरराेज जंगलात २० ते २५ किमी भटकंती करून डिंक गाेळा करायचे. पावसाळ्यात रानभाज्या गाेळा करण्याचे नित्याचे काम झाले हाेते. परिस्थितीमुळे कधी सायकललाही त्यांचा लहानपणी स्पर्श झाला नाही. वय वाढत गेले. लग्न झाले. मुले झाली, परंतु पायी चालण्याची सवय मात्र तुटू दिली नाही. आजही कुठेही जायचे असले की आपली पायी वारी ठरलेली असते. परिसरात त्यांना पैदल वारी म्हणूनच ओळखले जाते. वयाच्या ७५व्या वर्षातही ते दरराेज ३० ते ४० किमी पायी चालत असतात. असे हे अजब व्यक्तिमत्त्व असलेले आनंदराव तरुणांसाठी प्रेरणा आहे.
बाॅक्स
एसटीच्या सवलतीचाही फायदा नाही
राज्य परिवहन महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटाची सवलत दिली आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा सवलत पासही आहे. परंतु या सवलतीचाही कधी फायदा घेतला नाही. गुरुवारी ते साेनी या आपल्या गावाहून ९ किमी लाखांदूर येथे तहसीलच्या ठिकाणी आले. तहसीलमधील काम आटाेपून पुन्हा ९ किमी पायीच गेले. यांत्रिकीकरणाच्या युगात हा झपाटलेला माणूस रस्त्याने झपाझप चालताना लाखांदूर तालुक्यात दिसून येताे.
बाॅक्स
तंदुरुस्त आराेग्याचे रहस्य
दरराेज नियमित २० ते ३० किमी या वयातही आनंदराव पायीच चालतात. त्यामुळे आजपर्यंत त्यांना काेणत्या आजाराने स्पर्शही केला नाही. रक्तदाब, रक्तशर्करा किंवा इतर कुठल्याही आजाराची बाधा झाली नाही. ठणठणीत प्रकृती आहे. यामागचे रहस्य म्हणजे पायी चालणे असल्याचे आनंदराव अभिमानाने सांगतात.
220721\img-20210722-wa0030.jpg
वयाच्या ७४ वर्षी सोनी येथुन लाखांदुर पैदल येतांना आनंदराव खोब्रागडे