यशस्वी शस्त्रक्रियेनंतर चिमुकल्यांचे जीवन प्रकाशमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2017 00:31 IST2017-02-22T00:31:48+5:302017-02-22T00:31:48+5:30
जन्मताच डोळे व अन्य व्याधीने ग्रासलेल्या अशा तालुक्यातील १० चिमुकल्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांचे जीवन ...

यशस्वी शस्त्रक्रियेनंतर चिमुकल्यांचे जीवन प्रकाशमय
डॉक्टरांना यश : डोळे व अन्य व्याधींवर केली शस्त्रक्रिया
राहुल भुतांगे तुमसर
जन्मताच डोळे व अन्य व्याधीने ग्रासलेल्या अशा तालुक्यातील १० चिमुकल्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांचे जीवन प्रकाशमय करण्याची किमया येथील सु.बो. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने करून दाखविली. हर्ष सदानंद बांडेबुचे (३) रा.रोहा ता.मोहाडी, अमन मालाधारी (१२) रा.पाथरी ता.तुमसर, प्रवेश थोटे (१०) रा.तुमसर, पारस शेंडे (८) रा. पवनारखारी, प्रज्वल ठाकरे (११) रा.सिहोरा, मोहीत नागरे (११) रा.पाथरी, आकाश शेंद्रे (१२) रा.आसलपानी, हेमांश देरकर (८) रा.नाकाडोंगरी असे शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या चिमुकल्या रुग्णांची नावे आहेत.
उपजिल्हा रुग्णालय तुमसरचा प्रभार डॉ.सचिन बाळबुद्धे यांनी सांभाळला आहे. दुसरीकडे रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी रुग्णालयात तालुका बाहेरचे व मध्यप्रदेशातील रुग्ण मोठ्या संख्येनी हजेरी लावतात. बाह्य रूग्ण विभाग सांभाळून दहा चिमुकल्यांवर शस्त्रक्रिया करणे गरजेचे लक्षात येताच डॉ.सचिन बाळबुद्धे यांनी त्यांना राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. रुग्णांची एकाच दिवशी उपजिल्हा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना ग्रासलेल्या अनेक व्याधीपासून बरे केले.
हर्ष बांडेबुचे या तीन वर्षीय चिमुकल्याला मोतीयाबिंदूचा आजार गर्भाशयात असताना झाला. त्यामुळे त्याला दिसत नव्हते. मोतीयाबिंदूचा आजार हा सामान्यत: वयाच्या ५० वर्षानंतर होतो. तर बोटावर मोजण्याइतके लोकांना जन्मताच हा आजार होतो.
वयोवृद्ध माणसाची शस्त्रक्रिया वेगळी व तीन वर्षाच्या मुलाच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया वेगळी हे ओळखून डॉ.सचिन बाळबुद्धे यांनी डॉ.गोपाल सार्वे, डॉ.सिद्धार्थ चव्हाण, डॉ.किशोर मलेवार यांना सोबत घेऊन हर्षच्या डोळ्यांची यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याच्या जीवनात प्रकश घालण्याचे कार्य केले. त्या चिमुकल्यांच्या पालकांनी डॉक्टरांचे आभार मानले. त्यांच्या या कर्तृत्वाचे अनेकांनी कौतूकही केले.