खरिपानंतर आता रबी पिकांवरही अस्मानी संकट
By Admin | Updated: December 12, 2015 00:34 IST2015-12-12T00:34:51+5:302015-12-12T00:34:51+5:30
खरिपाच्या धान पिकाने नुकसान झाले. पर्णकोष व तुडतुड्याने हाताशी आलेले पीक गेल्याने उत्पादन खर्चही निघाला नाही.

खरिपानंतर आता रबी पिकांवरही अस्मानी संकट
मूग, उडी, हळद पिकांवर भर : मंडळ कृषी कार्यालय शेतावर
पालांदूर : खरिपाच्या धान पिकाने नुकसान झाले. पर्णकोष व तुडतुड्याने हाताशी आलेले पीक गेल्याने उत्पादन खर्चही निघाला नाही. रबीत तरी काही विशेष करुन उत्पन्न वाढविण्याच्या आशेने शर्थीचे प्रयत्नही किडीने धुळीस मिळविले. तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने बागायत पिकाला धोका वाढल्याने किड लागण्याची शक्यता बळावली आहे.
पालांदूर मंडळात रबी हंगामातील पेरणी क्षेत्र २,९१७.९० हेक्टर असून गहू १८४७.७० हेक्टर, हरभरा २६१.५० हेक्टर, मूग २४९.५० हेक्टर, उडीद ३३५ हेक्टरवर पेरणी केली आहे. मंडळ कृषी विभाग पालांदूर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून सभा घेत आहेत.
बांधावर मार्गदर्शनात मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोळके म्हणाले, पेरणीपूर्व बीजप्रक्रिया बियाणाला चोळून पेरणी करावी. मरणासन्न झाडे उपडून नष्ट करावे. पाने खाणाऱ्या अळींसाठी फवारणी करावी. रस शोषण करणाऱ्या किडींमुळे पाने पिवळी पडलेली आढळल्यास फवारणी करावी. हरभऱ्याची एक महिन्याची वाढ झाल्यास शेंडे खुडावे, जेणेकरुन वाढ जोमात होण्यास मदत होईल. मऱ्हेगाव ढिवरखेडा, पाथरी, खराशी, खुनारी, कनेरी, नरव्हा, लोहारा, पालांदूर आदी गावात सभा घेऊन पिक नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे बागायती शेतीला फटका बसत असून पाने खाणारी अळी जोरदार आक्रमण करीत आहे. भेंडीपिकाला बारीक पाखरे वेढली आहेत. पालांदूर परिसरात बागायतीचे क्षेत्रफळ वाढत आहे. ढगाळ वातावरणाने मेथी भाजी वाया जात आहे. (वार्ताहर)