निवृत्तीनंतर प्रत्येकांनी सेवाप्रवृत्त व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 21:56 IST2018-01-08T21:55:42+5:302018-01-08T21:56:05+5:30

वैदर्भिय सांस्कृतिक इतिहासाचा वारसा जपण्यासाठी डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे यांनी केलेले कार्य निश्चित उल्लेखनीय आहे.

After retirement, everyone should be sent to service | निवृत्तीनंतर प्रत्येकांनी सेवाप्रवृत्त व्हावे

निवृत्तीनंतर प्रत्येकांनी सेवाप्रवृत्त व्हावे

ठळक मुद्देश्रीपाद जोशी : गुरुप्रसाद पाखमोडे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

आॅनलाईन लोकमत
भंडारा : वैदर्भिय सांस्कृतिक इतिहासाचा वारसा जपण्यासाठी डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे यांनी केलेले कार्य निश्चित उल्लेखनीय आहे. हा त्यांच्या सेवाप्रवृत्तीचा सत्कार आहे. डॉ.पाखमोडे यांनी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर लोकहिताच्या कार्यात सेवाप्रवृत्त व्हावे, असे प्रतिपादन अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. पाखमोडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मंगलमय सभागृह येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हे होते. याप्रसंगी मराठी संत साहित्याचे ख्यातनाम संशोधक डॉ.म.रा.जोशी, विसासंघाचे उपाध्यक्ष डॉ.राजन जयस्वाल, डॉ. सत्यवान मेश्राम आदी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ.म.रा. जोशी यांच्या हस्ते प्राचार्य डॉ.पाखमोडे, शुभदा पाखमोडे यांचा मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. राजन जयस्वाल यांनी डॉ. पाखमोडे यांच्या कुशल प्रशासनाची व कार्यतत्परतेची ओळख देत त्यांना निरोगी दीर्घायुष्याची कामना केली. डॉ.सत्यवान मेश्राम यांनी डॉ.पाखमोडे यांच्या संशोधन कार्याच्या व वैशिष्ट्यांचा उल्लेख केला.
याप्रसंगी डॉ. पाखमोडे यांनी सत्काराला उत्तर देताना यानंतर उर्वरीत आयुष्य हे साहित्य सेवेत घालविण्याचे मनोदय व्यक्त करून आयुष्यात ज्यांनी सहकार्य केले त्यांच्याबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात डॉ.श्रीपाद जोशी यांनी भंडारा जिल्ह्यातील साहित्य चळवळीच्या योगदानाचा उल्लेख करून भंडारा जिल्ह्यातील डॉ.हरिश्चंद्र बोरकर, द.सा. बोरकर यांच्यासोबतच डॉ.पाखमोडे यांचे कार्य खूप मोठे आहे, असे सांगितले.
याप्रसंगी डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे यांचा विदर्भ साहित्य संघाच्या वतीने डॉ.अनिल नितनवरे यांनी प्रगती महिला समाज संस्थेच्या रेखा देशकर, झाडीबोली साहित्य मंडळाचे डॉ. हरिश्चंद्र बोरकर, बंडोपंत बोढेकर, हिरामण लांजे, युगसंवाद संस्थेचे सचिव प्रा.नरेश आंबीलकर, डॉ.सुरेश खोब्रागडे, बासप्पा फाये, संस्कार भारतीचे प्रा.सुमंत देशपांडे, योगीता देशपांडे, सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने हर्षल मेश्राम, प्रा.विनोद मेश्राम, मैफलाच वतीने प्रल्हाद सोनवाने, लॉयन्स क्लबच्या वतीने अ‍ॅड.विनोद भोले तसेच आचार्य पदवीचे विद्यार्थी डॉ.हेमंत देशमुख, डॉ.दत्तात्रय वाटमोडे, डॉ. वैशाली सुरकर, डॉ. वैशाली पाटील, डॉ. निलीमा कापसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

Web Title: After retirement, everyone should be sent to service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.