लग्न होताच नववधू झाली कुटुंबीयासोबत पसार
By Admin | Updated: March 21, 2015 01:19 IST2015-03-21T01:19:03+5:302015-03-21T01:19:03+5:30
सामान्यत: युवक वर्ग युवतींना फसविल्याच्या घटना घडतात. परंतु तुमसरातील एका तरुणाला तिरोडा

लग्न होताच नववधू झाली कुटुंबीयासोबत पसार
८० हजारांनी वराला गंडविले : लग्न सोहळा झाल्यानंतरची घटना
तुमसर : सामान्यत: युवक वर्ग युवतींना फसविल्याच्या घटना घडतात. परंतु तुमसरातील एका तरुणाला तिरोडा तालुक्यातील एका तरुणीने लग्नाचे आमिष देऊन गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. या युवतीने मंदिरात लग्न लागल्यानंतर आपल्या कुटुंबीयांसोबत पळ काढला. युवतीच्या अंगावर सुमारे ८० हजाराचे सोन्याचे दागिने होते. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्याची माहिती आहे.
तुमसरातील एका युवकाचे लग्न तिरोडा तालुक्यातील विर्सी फाटा गावातील एका मुलीशी ठरले होते. दोन दिवसापूर्वी मुंडीकाटाजवळील नवेगाव येथील एका मंदिरात त्यांचे लग्न झाले. वऱ्हाड्याचे भोजनाचा कार्यक्रम सुरु असताना मुलीने प्रसाधनगृहाकडे जातो म्हणून ती गेली, बराच वेळ ती परत आली नाही म्हणून शोधाशोध सुरु झाली.
मंदिरात लग्न लावणारा पूजारी तथा मुलीचे वडील व कुटुंबीय प्रसार झाले होते. युवकाकडील मंडळीना फसवणूक झाल्याचे समजते. वराचा लहान भावाने तुमसर पोलीस ठाणे गाठले. गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. परंतु घटना तिरोडा तालुक्याच्या हद्दीतील असल्याने तक्रारकर्त्यांना तिरोडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यास सांगण्यात आले.
वधूच्या अंगावर वराकडून सुमारे ८० हजाराचे दागिने दिले होते. यासंदर्भात तिरोडा येथील पोलिस ठाण्यात संपर्क साधल्यावर दूपारी ३ पर्यंत अशी तक्रार आली नाही अशी माहिती दिली. दोन्ही कुटुंबीयाच्या सहमतीने हे लग्न ठरले होते. लग्नात खर्चाला फाटा देऊन मंदिरात लग्न करण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबीयांनी घेतला होता.
मंदिरातून युवती कुटुंबीयांसोबत पसार झाल्याने तसे रॅकेट तर येथे सक्रीय असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. अशा घटनेवर आळा बसणे आवश्यक आहे. अशा घटना या परिसरात यापूर्वीसुध्दा घडल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)