दोन वाघांच्या मृत्यूनंतर पर्यटकांनी फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:19 IST2019-02-03T23:19:34+5:302019-02-03T23:19:47+5:30
उमरेड-कºहांडला अभयारण्य : पवनी गेटचे आकर्षण संपले अशोक पारधी। लोकमत न्यूज नेटवर्क पवनी : जंगल दणाणून टाकणारी आरोळी आणि ...

दोन वाघांच्या मृत्यूनंतर पर्यटकांनी फिरविली पाठ
उमरेड-कºहांडला अभयारण्य : पवनी गेटचे आकर्षण संपले
अशोक पारधी।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : जंगल दणाणून टाकणारी आरोळी आणि रुबाबदार शरीरयष्टीच्या वाघांचा मृत्यू झाल्यानंतर पर्यटकांनी उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्याकडे पाठ फिरविली आहे. हमखास व्याघ्र दर्शन होत असल्याने येणारा पर्यटकांचा ओघ आता गत महिन्याभरापासून मंदावला आहे. तर दुसरीकडे या दोन वाघांच्या मृत्यूचे गुढ महिन्याभरानंतरही कायम आहे.
उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात जय वाघाचा परिवार होता. आशिया खंडात रुबाबदार वाघ म्हणून जयची ओळख होती. त्याचे बछडेही तेवढेच रुबाबदार होते. त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी पवनी गेट वर दिसत होती. वनपर्यटनासोबत व्याघ्र दर्शन होत असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने येत होते. त्यातून वनविभागाला मोठे उत्पन्न मिळत होते. परंतू जय वाघ बेपत्ता झाला. त्याचा थांगपत्ता लागला नाही. मात्र चार्जर आणि राही वाघीण या अभयारण्याचे आकर्षण ठरले होते.
अनेक पर्यटकांना या वाघाने दर्शन दिले होते. त्यामुळे उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य पर्यटकात आवडीचे ठिकाण झाले होते. पंरतु सरत्यावर्षाच्या शेवटी चिचगाव कक्ष क्र. २२६ मध्ये ३० डिसेंबर रोजी चार्जर वाघाचा आणि दुसऱ्या दिवशी ३१ डिसेंबर रोजी राही वाघीणीचा मृतदेह आढळून आला. सलग दोन वाघांच्या मृत्यूने वनविभाग हादरुन गेला. या वाघाच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. मात्र महिना झालातरी कोणताच थांगपत्ता लागला नाही.
महिन्याभरापूर्वी या दोन वाघाच्या मृत्यूनंतर वन्यजीवप्रेमी हळहळले. आता तर या अभयारण्याकडे पर्यटकांनी जणू पाठच फिरविली आहे. पुर्वी पहाटेपासून पर्यटकांची पवनी गेटवर गर्दी दिसायची. जंगलातही भ्रमंती सुरु असायची. मात्र महिन्याभरापुर्वी चार्जर आणि राहिचा मृत्यू झाला. त्यानंतर पर्यटकांनी या अभयारण्याकडे पाठ फिरविली आहे.
आरोपींचा थांगपत्ता नाही
चार्जर आणि राही या दोघ वाघांच्या मृत्यूचा तपास वन्यजीव विभाग करीत आहे. सुरुवातीला या वाघांच्या अवयवांचे नमुणे नागपूरच्या फॉरेन्सीक लॅबकडे पाठविण्यात आले. पंरतू त्यात वाघांच्या मृत्यूचे कारण पुरते स्पष्ट झाले नाही. त्यामुळे आता या वाघांच्या अवयवांचे नमुणे भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थेकडे पाठविण्यात आले आहे. या अहवालाची प्रतीक्षा आहे. वनविभागाने अभयारण्यानजिक असलेल्या गावातील अनेक शेतकºयांची चौकशी केली. मात्र त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. वाघांच्या हत्येची माहिती देणाºयास बक्षीसही घोषित करण्यात आले. पंरतु ठोस काहीच हाती लागले नाही.