स्वच्छतेनंतर स्मशानभूमी परिसर बनला रमणीय
By Admin | Updated: November 15, 2014 22:41 IST2014-11-15T22:41:21+5:302014-11-15T22:41:21+5:30
शहरालगत असलेल्या वैनगंगा नदीघाटावर वाढलेली झाडे-झुडपे व अस्वच्छता बघून अंत्ययात्रेत येणाऱ्या आप्तांनाही वेदना होत होत्या. मात्र, त्यावर उपाययोजना करण्यासाठी कुणीही धजावला नाही.

स्वच्छतेनंतर स्मशानभूमी परिसर बनला रमणीय
भंडारा : शहरालगत असलेल्या वैनगंगा नदीघाटावर वाढलेली झाडे-झुडपे व अस्वच्छता बघून अंत्ययात्रेत येणाऱ्या आप्तांनाही वेदना होत होत्या. मात्र, त्यावर उपाययोजना करण्यासाठी कुणीही धजावला नाही. स्माशनभुमी परिसर सौंदर्यीकरणाचा दिवस शुक्रवारला उजाडला. शहरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर या परिसराला भेट दिली असता स्मशानभुमी परिसराचा चेहरामोहरा पूर्णत: पालटल्याचे दिसून आले. या स्वच्छता मोहीमेमुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या आप्तांना कोणत्याही दुर्गंधीला सामोरे जावे लागणार नाही.
स्मशानभुमी म्हटली तर नाव घेताच शहारे येतात. अंत्ययात्रेत आप्त, शेजारी, मित्र जात असल्यामुळे अंत्ययात्रेत जातात. एरव्ही स्मशानभुमीकडे जाणाऱ्यांची संख्या गौण असते.
भंडारा शहरात अंत्यसंस्कार करण्यासाठी वैनगंगा नदीघाटावरील स्मशानभुमीचा वापर करण्यात येतो. मृत्यूनंतर त्याला मोक्ष व चिरशांती लाभावी, यासाठी कुटूंबीय मृतकाची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. स्वकीयाच्या मृत्यूनंतर त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपड होत असली तरी, भंडारा शहरातील स्मशानभुमीकडे जाणाऱ्या मार्गापासून ते स्मशानभुमीपर्यंत वाढलेल्या झुडूपांनी नागरिकांना त्रस्त केले होते.
स्मशानभुमी तशीही गावाच्या शेवटच्या टोकावर असते. भंडारा येथील स्मशानभुमी नदीच्या तिरावर असल्याने सतत वाहत राहणाऱ्या पाण्याने तिचे सौंदर्य खुलले आहे. मात्र पालिका आणि जिल्हा प्रशासनाने तिथे वाढत असलेली झुडूपे तोडण्याकडे दुर्लक्ष केल्याने ही झुडूपे मुख्य रस्त्यावर आलेली होती. त्यामुळे स्मशानभुमीचा मार्ग अक्षरश: दबल्यागत झाला होता. झुडूपांमुळे स्मशानभुमीचे दुरून दिसने दुरापस्त झाले होते. स्मशानभुमीकडे जाणाऱ्या मार्गाचे काम करण्यासाठी प्रशासनाने लाखो रूपयांच्या प्रस्तावाला हिरवी झेंडी दिली आहे. मात्र काम सुरू व्हायला वेळ असल्याने रस्त्यावरील झुडूपांचे वाढलेले अवास्तव छोटे जंगल कटाईकडे दुर्लक्ष झाले होते. स्मशानभुमीवर अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना वाहने ठेवण्यासाठी जागाही व्यवस्थित नव्हती. नदीत उतरण्यासाठी बनविण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या मार्गावर नदीच्या प्रवाहातून आलेल्या मातीने पायऱ्याही पूर्णत: बुजलेल्या होत्या. या पायऱ्यावरील सर्व मलबा काढून स्मशानभुमीचे सौंदर्यीकरण करण्यासाठी हिंदू रक्षा मंचने पुढाकार घेतला.
स्वच्छता अभियानात सहभाग घेण्यासाठी श्रमदान करण्याचे आवाहन शहरवासीयांना करण्यात आले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने श्रमदान केले. या कार्यात काहींनी विनामुल्य जेसीबी दिले, काहींनी आपल्या कामावरील मजुरांना स्वच्छतेसाठी पाठविले. काहींनी ट्रॅक्टर दिले तर शेकडो हाथ स्वच्छतेसाठी सढळ हाताने पुढे आले. पालिका किंवा प्रशासनाकडून हे काम करावयाचे झाले असते तर किमान चार ते पाच लाख रुपयांचे अंदाजपत्रक बनवून पैसा कंत्राटदाराच्या खिशात गेला असता. श्रमदानातुन स्मशानभुमीचा कायापालट होऊ शकतो, यावर कुणाचा विश्वास बसणार नसेल तर एकदा तरी विरंगुळ्यासाठी या ठिकाणी भेट देऊन या. (शहर प्रतिनिधी)