अखेर ‘त्या’ रेतीचा लिलाव
By Admin | Updated: September 1, 2014 23:20 IST2014-09-01T23:20:20+5:302014-09-01T23:20:20+5:30
तालुक्यातील पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून साठा करून ठेवल्या जात असल्याची माहिती मिळताच तहसीलदार हंसा मोहने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व महसूल विभाग यांच्या

अखेर ‘त्या’ रेतीचा लिलाव
प्रकरण अवैध रेती साठ्याचे : साकोली तालुक्यातील पहिले प्रकरण
साकोली : तालुक्यातील पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून साठा करून ठेवल्या जात असल्याची माहिती मिळताच तहसीलदार हंसा मोहने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडउमरी येथे कार्यवाही करण्यात आली. यात २२७ ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला. अशाप्रकारची ही कारवाई पहिल्यांदाच तहसीलदार मोहने यांच्या कार्यकाळात करण्यात आली.
जुलै महिन्यात साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गोंडउमरी येथे रेतीचा अवैध साठा करून ठेवण्यात आली आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली होती. ही माहिती पोलीस ठाण्यामार्फत साकोलीचे तहसीलदार यांना देण्यात आली. तहसीलदार हंसा मोहने यांनी यात पुढाकार घेऊन समिती गठित केली.
नायब तहसीलदार दिनकर खोत, मंडळ अधिकारी कारेमोरे, पोलीस उपनिरीक्षक बंसोड यांनी गोंडउमरी येथे जाऊन पवन झगडे यांचे घराजवळ ८० ब्रास, माटे यांच्या घराजवळ ४५ ब्रास व परसराम चांदेवार यांचे घराजवळ ५२ ब्रास व अरसोडे यांचे घराजवळ ५० ब्रास असे एकूण २२७ ब्रास रेती साठा उपलब्ध होता. महसूल व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर या रेतीची मोजणी लाखांदूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून करण्यात आली. सदर रेतीची किंमत एक लाखापेक्षा जास्त असून या रेतीचा लिलाव येत्या १६ सप्टेबरला साकोली तहसील कार्यालयात करण्यात येणार आहे.
साकोली तहसील कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैधरित्या रेतीसाठा करणाऱ्या रेतीमाफीयावर चांगलाच वचक बसला आहे. साकोली तालुक्यात कोणत्याही ठिकाणी असा रेतीसाठा असल्यास त्याची माहिती पोलीस किंवा तहसील कार्यालयात देण्याचे आवाहनही तहसीलदार मोहने यांनी नागरिकांना केले आहे.
(तालुका प्रतिनिधी)