खासदारांच्या आश्वासनानंतर शिक्षकांच्या उपोषणाची सांगता
By Admin | Updated: November 19, 2014 22:34 IST2014-11-19T22:34:02+5:302014-11-19T22:34:02+5:30
प्राथमिक शिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे मासिक वेतन आणि २००६ पासून प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आमरण उपोषणासाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांना त्यांच्या मागण्या सोडविण्याचे आश्वासन

खासदारांच्या आश्वासनानंतर शिक्षकांच्या उपोषणाची सांगता
भंडारा : प्राथमिक शिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे मासिक वेतन आणि २००६ पासून प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आमरण उपोषणासाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांना त्यांच्या मागण्या सोडविण्याचे आश्वासन खासदार नाना पटोले यांनी दिले. त्यानंतर या उपोषणाची सांगता करण्यात आली.
काल, मंगळवार रोजी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाला प्रारंभ करण्यात आला.
या उपोषणमंडपाला आमदार चरण वाघमारे, आ.राजेश काशिवार, आ.रामचंद्र अवसरे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राम्हणकर यांनी भेटी दिल्या. सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास खा.नाना पटोले, जि.प. उपाध्यक्ष रमेश पारधी, भरत खंडाईत यांनी शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधून वेतनाचा निधी दोन दिवसात जिल्हा परिषदेला प्राप्त होईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांचे आॅक्टोबर महिन्याचे मासिक वेतन २५ नोव्हेंबर पर्यंत शिक्षकांना प्राप्त होणार आहे. या विलंबासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर राज्य शासनानुसार कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे खा.पटोले यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, विद्यार्थ्यांचे शैक्षणित हित लक्षात घेता आमरण उपोषण मागे घ्यावे असे आवाहन केले. शिक्षकांनी मागण्यांची पूर्तता न झाल्यास यापुढेही उपोषण करण्यात येईल, अशी घोषणा करताच खा.पटोले यांनी शिक्षकांना वेतन नियमित न मिळणे ही गंभीर बाब समजून त्या समस्या सोडविण्यासाठी मी जबाबदारी स्वीकारतो असे आश्वासन त्यांनी उपोषणकर्त्यांना दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, शिलकुमार वैद्य, नरेश कोल्हे, रमेश काटेखाये, केशव अतकरी, शंकर नखाते, योगेश कुटे, तुलशीदास पटले, अशोक ठाकरे, केशव बुरडे, मुलचंद वाघाये, नरेश देशमुख, हिवराज लंजे, टी.डी. दमाहे, विजय चाचेरे, अरुण बघेले यांच्यासह जवळपास ६४ शिक्षक उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)