आश्वासनानंतर उपोषणाची सांगता
By Admin | Updated: February 5, 2016 00:35 IST2016-02-05T00:35:07+5:302016-02-05T00:35:07+5:30
शहराच्या राजेंद्र नगरातील संताजी सभागृहाजवळ मंजूर उद्यान व सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम रखडल्याप्रकरणी ...

आश्वासनानंतर उपोषणाची सांगता
नगर पालिकेचे आश्वासन : तीन महिन्यात मागण्या पूर्ण होणार
तुमसर : शहराच्या राजेंद्र नगरातील संताजी सभागृहाजवळ मंजूर उद्यान व सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम रखडल्याप्रकरणी शहरातील विविध संघटनांचे १३ जणांनी आमरण उपोषण मंगळवारी सुरु होते. शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता शहरातील बाजार परिसरातील हुतात्मा स्मारकाजवळ त्यांनी उपोषण प्रारंभ केला होता. बुधवारी सायंकाळच्या सुमारास नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी उपोषण मंडपाला भेट देवून मागण्या तीन महिन्यात पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषणाची रितसर सांगता करण्यात आली.
संताजी सभागृहाजवळील मोकळ्या जागेवर मंजूर उद्यान व सभागृहाचे बांधकाम सन २०१२ पासून रखडले आहे. याबाबत संबंधितांना पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष करण्यात आले. उद्यान व सभागृहाचे बांधकाम त्वरीत करण्यात यावे, याकरिता शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता शांततामय मार्गाने आमरण उपोषणाचा निर्णय शहरातील विविध संघटनांच्या १३ प्रतिनिधींनी घेतला. उद्यान व सभागृह बांधकामाकरिता सुनिल श्रावणकर यांनी २८ फेब्रुवारी २०१२ ते ४ आॅगस्ट २०१५ असे तीन वर्ष सतत संबंधितांना पत्रव्यवहार केला. परंतु कारवाई झाली नाही. सदर प्रकरणाबाबत विभागीय आयुक्तांनाही पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु त्या पत्राचे आजपर्यंत उत्तर देण्यात आले नाही. याकरिता सुनिल श्रावणकर, वामन पडोळे, विजय पाटील, महेंद्र उईके, शैलेश मेश्राम, संजय धुर्वे, कैलाश साठवणे, विनोद देशमुख, श्रावण रोहणकर, सिद्धार्थ थार्सेकर, सुनिल वंजारी, लोणारे, चंदेल यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. अखेर पालिका प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)