अखेर 'त्या' रस्त्याच्या कामाला सुरुवात
By Admin | Updated: February 12, 2015 00:37 IST2015-02-12T00:37:02+5:302015-02-12T00:37:02+5:30
खडकी पालोरा या रस्त्याच्या दुरूस्ती व डांबरीकरणाचे काम दोन महिन्यांपूर्वी मंजूर झाले. मात्र, कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ...

अखेर 'त्या' रस्त्याच्या कामाला सुरुवात
दणका लोकमतचा
करडी (पालोरा) : खडकी पालोरा या रस्त्याच्या दुरूस्ती व डांबरीकरणाचे काम दोन महिन्यांपूर्वी मंजूर झाले. मात्र, कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची दैनावस्था झाली असतानाही काम बंद करण्यात आले होते. याबाबत २८ जानेवारीला लोकमतने वृत्त प्रकाशित केले. यामुळे यंत्रणेत खळबळ उडाल्याने बंद रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
खडकी-पालोरा तीन कि.मी. रस्त्यासाठी सहा लाख रुपये दोन महिन्यापूर्वी मंजूर करण्यात आले. मुंढरी (बु.) ते करडी रस्त्यासाठी डांबरीकरण पॅचेससाठी १० लाखाचा निधीसुद्धा दोन महिन्यापूर्वी मंजूर करण्यात आला. परंतु ठेकेदाराकडून कामाला सुरुवात केली जात नव्हती. संपूर्ण रस्ते उखडले होते.
रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण झाले होते. अपघातांची संख्यासुद्धा वाढली होती. खडकी येथील मुलीचा तिच्याच घरासमोर अपघातात जीव गेल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला होता.
विभाग ठेकेदारांच्या साठगाठीने रस्ता दुरुस्तीचे काम थंडबस्त्यात ठेवण्यात आले होते.
मुंढरी ते बोरी जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या रस्त्यांचे काम तीन महिन्यापूर्वी मंजूर झाले. वर्क आॅर्डर दिले गेले. मात्र याच ठेकेदाराने उपरोक्त दोन्ही रस्त्यांप्रमाणे कामे अडवून ठेवली, असा आक्षेपही जिल्हा परिषद सदस्य बाबूजी ठवकर यांनी नोंदविला. याबाबत लोकमतने २८ जानेवारीला वृत्त प्रकाशित करताच बांधकाम विभाग व ठेकेदाराचे धाबे दणाणले. वृत्ताने जागे झालेल्या बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामाला त्वरीत सुरुवात केली. (वार्ताहर)