अपघातानंतर पालिकेला आली जाग
By Admin | Updated: June 5, 2016 00:24 IST2016-06-05T00:24:07+5:302016-06-05T00:24:07+5:30
सार्वजनिक शौचालयाची इमारत भुईसपाट केल्यावर खड्डा बुजविण्यात आला नाही.

अपघातानंतर पालिकेला आली जाग
तुमसर : सार्वजनिक शौचालयाची इमारत भुईसपाट केल्यावर खड्डा बुजविण्यात आला नाही. या खड्यात एक गर्भवती गाय पडली. तीन तासानंतर पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यंत्राच्या सहाय्याने तिला सुखरुप बाहेर काढण्यत आले.
शहरातील बजाज नगरात जुने सार्वजनिक शौचालय होते. ते शौचालय पालिकेने भूईसपाट केले. परंतु शौचालयाचा खड्डा बुजविला नाही. चार महिन्यापूर्वी पालिकेने ही कारवाई केली होती. गुरुवारी दुपारी एक गर्भवती गाय चाऱ्याकरिता येथे भटकत आली. खड्याच्या बाजूला मलबा होता. मलबा घसरून ती सरळ खड्यात पडली. खड्यात पाणी होते. खड्याचे तोंड निमुळते होते. त्यामुळे ती उभी होऊ शकत नव्हती. शेवटी जीव गुदमरण्याचा प्रसंग तिच्यावर ओढावला. परिसरातील तीन ते चार युवकांनी एक दोरखंड बांधून गायीला वर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु गायीचे वजन जास्त व खड्याचे तोंड निमुळते असल्याने त्यांना यश आले नाही. घटनास्थळी भेट देऊन थेट नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे व पालिका मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती दिली. मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे व कर्मचारी घटनास्थळी यंत्र साहित्यासह आले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून गायीला खड्यातून बाहेर काढले. एका गायीला येथे जीवदान भेटले. भूईसपाट शौचालयाजवळील दोन खड्डेही कर्मचाऱ्यांनी बुजविले. (तालुका प्रतिनिधी)