अपघातानंतर दोन्ही ट्रक पेटले, चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 21:40 IST2019-01-15T21:38:58+5:302019-01-15T21:40:03+5:30
भरधाव ट्रक एकमेकांवर आदळल्यानंतर लागलेल्या आगीत चालक होरपळून ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील सिंगोरी येथे सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दोन्ही ट्रकची राखरांगोळी झाली असून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती.

अपघातानंतर दोन्ही ट्रक पेटले, चालक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भरधाव ट्रक एकमेकांवर आदळल्यानंतर लागलेल्या आगीत चालक होरपळून ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील सिंगोरी येथे सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दोन्ही ट्रकची राखरांगोळी झाली असून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती.
घनश्याम सदाशिव वाडीवा (३२) रा.मुरमाडी (लाखनी) असे मृताचे नाव आहे. तर अजय योगराज सोनवने (२०) रा.कन्हान जि. नागपूर असे जखमीचे नाव आहे. या आगीत घनश्यामचा जळून कोळसा झाला होता. सोमवारी सायंकाळी खरबीवरून धान रिकामे करून ट्रक क्रमांक सीजी ०४ जेसी ३२३५ लाखनीकडे जात होता. तर साकोलीकडून ट्रक क्रमांक एमएच ४० बीजे ७००१ हा नागपुरकडे जात होता. राष्ट्रीय महामार्गावरील सिंगोरी गावाजवळ या दोन ट्रकची टक्कर झाली. टक्कर एवढी भीषण होती की, घर्षणानंतर दोन्ही ट्रकने पेट घेतला. त्यातच डिझेलची टाकी फुटल्याने मोठा अनर्थ घडला. अपघात घडताच ट्रकमधील चालक - वाहकांनी उड्या टाकल्या. मात्र घनश्याम वाडीवा हा आगीच्या ज्वाळात सापडला. अवघ्या काही वेळातच त्याचा जळून कोळसा झाला.
या घटनेची माहिती कारधा पोलिसांना देण्यात आली. तसेच अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आले. कारधाचे ठाणेदार गजानन कंकाळे, पोलीस उपनिरीक्षक रुपाली फटींग यांच्यासह व जिल्हा वाहतूक शाखेचे बाळकृष्ण गाडे घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाच्या दोन वाहनांनी या आगीवर काही वेळानंतर नियंत्रण मिळविले. प्रत्यक्षदर्शीनुसार हा अपघात अतीवेगाने झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी प्रमोद शेंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघात घडला तेव्हा तेथे वाहनधारकांची मोठी गर्दी झाली होती. आग विझविणे अशक्य दिसत होते. तसेच डिझेलच्या टँकच्या स्फोटाचीही भीती असल्याने कुणी जवळ जाण्याची हिंमत करीत नव्हता.
महामार्गावर तीन तास वाहतूक ठप्प
अतीशय व्यस्त राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रक पेटत असल्याने या मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती. वाहनांच्या दोन्ही बाजूला लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कारखान्यातील रात्रपाळी आटोपून घरी परतणारे कर्मचारीही यात अडकले होते. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.