७२ तासानंतरही हल्लेखोर मोकाट
By Admin | Updated: August 15, 2015 01:01 IST2015-08-15T01:01:04+5:302015-08-15T01:01:04+5:30
दहा हल्लेखोरांनी राकाँच्या नगरसेवकावर बुधवारी सकाळी प्राणघातक हल्ला केला.

७२ तासानंतरही हल्लेखोर मोकाट
तुमसर : दहा हल्लेखोरांनी राकाँच्या नगरसेवकावर बुधवारी सकाळी प्राणघातक हल्ला केला. ७२ तासांचा अवधी लोटल्यानंतरही हल्लेखोरांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले नाही. या घटनेमुळे शहरात टोळीयुध्द भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नगरसेवक प्रशांत उके हे बुधवारी सकाळी ६.४५ वाजता तुमसर-कटंगी मार्गावर घराचे बांधकाम पाहण्याकरिता दुचाकीने जात होते. दरम्यान समोरुन येणाऱ्या चारचाकी वाहनातून हल्लेखोर उतरुन नगरसेवक उके यांच्यावर बंदूकीतून गोळ्या झाडल्या. गोळी न लागल्याने हल्लेखोरांनी चाकुने वार केला. नंतर हल्लेखोर चारचाकीतून पसार झाले.
नगरसेवक उके यांच्यावर आरोपी संतोष डहाट, सतिष डहाट, आशिष गजभिये, अमन नागदेवे, मोनु नागदेवे, दगडे घोडीचोर रा. आंबेडकर वॉर्ड तुमसर यांनी हल्ला केला. उर्वरीत चार आरोपी अनोळखी होते. दहा आरोपींचा शोध सुरु आहे. एका चारचाकीतून दहा हल्लेखोर आले होते. त्यापैकी चार हल्लेखोरांनी प्रथम प्राणघातक हल्ला केला. सहा आरोपी आंबेडकर वॉर्ड, तुमसर येथील रहिवासी आहेत.
जून्या वैमनस्यातून हल्ला झाला असा पोलिसांचा अंदाज आहे. यामुळे येथे टोळीयुध्द भडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे शहरात पोलीस प्रशासनाला सतर्क राहण्याची गरज असून कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.
नगरसेवक उके यांच्यावर प्राणघातक हल्ला होण्यामागचे कारण कोणती याचा तपास पोलीस विभाग करीत असल्याची माहिती आहे. हल्ला पुर्व नियोजित होता. चार आरोपी अनोळखी होते. ते भाडोत्री गुंड होते काय? त्यांच्याजवळ देशी कट्टा कुठून आला. झाडलेल्या गोळ्यांचा शोध पोलीस घेत आहे. हल्लेखोर नागपूर शहराच्या दिशेने पळून गेल्याचे समजते.
दहा हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला यात उके बचावले. हल्लेखोरांनी उके यांना खबरदार करण्याकरिता तर हल्ला केला नाही ना? या बिंदूवर ही पोलीस यंत्रणा तपास कार्यात गुंतलेली दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)