२२ वर्षानंतर मंडळाला आली जाग

By Admin | Updated: September 3, 2014 23:08 IST2014-09-03T23:08:41+5:302014-09-03T23:08:41+5:30

सन १९९२-९३ च्या परीक्षा प्रकरणाचे शुल्क भरले नसल्याचे पत्र न्यायालयात सादर केले. येथे २२ वर्षानंतर शिक्षण मंडळाला जाग आली असून वास्तविक शुल्क न भरून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसताच येत नाही.

After 22 years came to the Board | २२ वर्षानंतर मंडळाला आली जाग

२२ वर्षानंतर मंडळाला आली जाग

भोंगळ कारभार : सीआयडी चौकशीची मागणी
भंडारा: सन १९९२-९३ च्या परीक्षा प्रकरणाचे शुल्क भरले नसल्याचे पत्र न्यायालयात सादर केले. येथे २२ वर्षानंतर शिक्षण मंडळाला जाग आली असून वास्तविक शुल्क न भरून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसताच येत नाही. असे असताना परीक्षा मंडळाने हा वाद सुरु केल्याचा आरोप शारदा विद्यालयाचे प्राचार्य तथा शिक्षण मंडळ सदस्य राजकुमार बालपांडे यांनी केला आहे.
सन १९९३-९४ या शैक्षणिक सत्रात गोपी घनश्याम बडवाईक हे लिपीक म्हणून शारदा विद्यालयात कार्यरत होते. विद्यार्थ्यांचे दहावीच्या शिक्षण मंडळाने परीक्षेचे अर्ज करणे, ड्राफ्ट काढणे व मंडळाकडे जमा करण्याचे काम लिपिकाचे असते. लिपीक गोपी बडवाईक यांनी ड्राफ्टची बनावट स्लीप तयार करुन बनावट ओ.सी. दाखविली. कालांतराने लिपिकाने अर्ज जमा केले नाही. परीक्षा शुल्क व ड्रॉफ्टची रक्कम गहाळ केली. पुढे शाळेत ते गैरहजर राहिले.
शालेय कामकाज रेंगाळू नये म्हणून लिपीक गोपी बडवाईक यांचे कपाट कर्मचाऱ्यासमक्ष उघडण्यात आले. त्यात विद्यार्थिनींचे आवेदन पत्राचा गठ्ठा आढळून आला होता. संस्थाध्यक्ष महाबीरप्रसाद अग्रवाल, लिपीक तथा तक्रारकर्त्यांचे वडील सचिव घनश्याम बडवाईक यांना तशी सूचना दिली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता शिक्षण मंडळाच्या नियमानुसार अतिविलंब शुल्कासह ५७,१२० भरण्यासाठी सांगितले. संस्थाध्यक्ष महाबीरप्रसाद अग्रवाल यांनी तत्कालीन सचिव घनश्याम बडवाईक व तत्कालीन प्राचार्य निलीमा चव्हाण यांना अतिविलंब शुल्क व परीक्षा अर्ज नागपूर बोर्डात जाण्याबाबत सांगितले.
दि.३० डिसेंबर १९९३ ला तत्कालीन सचिव घनश्याम बडवाईक, माकडे विद्यालयाचे मुख्याध्यापक घोडीचोर नागपूर बोर्डात गेले. घनश्याम बडवाईक यांनी स्वत: ५७,१२० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट काढला. स्वहस्ताक्षरात आवेदनपत्र स्वीकारण्याबाबत पत्र लिहून पत्रात ५७,१२० चा डी.डी. क्रमांक लिहून स्वाक्षरी घेऊन बोर्डाच्या लिपिकाकडे ४२ विद्यार्थिनींचे परीक्षा अर्ज जमा केले. ती रेकॉर्डला उपलब्ध आहे.
शिक्षण मंडळात परीक्षा शुल्काचा डी.डी. स्वीकारल्याशिवाय आवेदनपत्र स्वीकारल्या जात नाही. मार्च १९९४ मध्ये ४२ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. २० वर्षानंतर शिक्षण मंडळ येथे परीक्षा शुल्क भरले नाही असा जावईशोध करीत आहे.
या प्रकरणाचा उलगडा करण्याकरिता तत्कालीन सचिव घनश्याम बडवाईक व तत्कालीन लिपीक गोपी बडवाईक यांनी मंडळात सादर केलेले हस्तलिखीत पत्र व इतर दस्ताऐवजाची तज्ज्ञांकडून शहानिशा करण्याची गरज आहे. तक्रारकर्ते सचिन बडवाईक यांनी केलेले आरोप व शिक्षण मंडळाने कोणतीच बिंदूनुसार चौकशी केली नाही. याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे प्राचार्य राजकुमार बालपांडे यांनी सांगितले.तत्कालीन सचिव घनश्याम बडवाईक यांनी बनावट कागदपत्रे दिल्याप्रकरणी न्यायालयाने फटकारले असल्याचे आरोपही प्राचार्य बालपांडे यांनी केला आहे. येथे वडील संस्थेचे तत्कालीन सचिव असतानीच मुलगा गोपी बडवाईक याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. शिक्षण मंडळ नियमावर बोट ठेवते. २० वर्षापूर्वीचा दस्ताऐवज नाही, असे सांगत आहे. त्यावर्षीचा आॅडीट झाला. मग रक्कम गेली कुठे? नागपूर विभागीय शिक्षण मंडळांतर्गत इतर शाळेसंदर्भात असा प्रकार तर घडला नाही. या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशीची मागणीही प्राचार्य राजकुमार बालपांडे यांनी केली आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण संचालकांना भेटून शिक्षण मंडळातील कारभाराची चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: After 22 years came to the Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.