१९ दिवसांनंतर मृत्यूशी झुंज संपली
By Admin | Updated: September 1, 2015 00:28 IST2015-09-01T00:28:11+5:302015-09-01T00:28:11+5:30
येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर पाच हल्लेखोरांनी देशी कटटयातून प्राणघातक हल्ला केला होता.

१९ दिवसांनंतर मृत्यूशी झुंज संपली
प्रयत्न ठरले निष्फळ : नगरसेवक प्रशांत उके यांचे उपचारादरम्यान निधन
तुमसर : येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर पाच हल्लेखोरांनी देशी कटटयातून प्राणघातक हल्ला केला होता. तब्बल १९ दिवसापर्यंत त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. अखेर सोमवारला सकाळी ८.३० च्या सुमारास ही झुंज संपली. या प्राणघातक हल्ल्यात त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीची जखम वाढल्याने (फंगस) त्यांना हैद्राबाद नेण्याची तयारी सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दि. १२ आॅग्सट रोजी सकाळी ६.३० वाजता तुमसर कटंगी मार्गावरील नवनिर्मित घराचे बांधकाम पाहण्यासाठी दुचाकीने जाताना चारचाकी वाहनातून आलेल्या पाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. देशी कटट्यातून दोन फैरी झाडल्या. नेम चुकल्यानंतर ते रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळले. त्यानंतर हल्लेखोरांनी चाकूने वार केले. यात त्यांच्या उजव्या मांडीवर व डाव्या खांद्यावर खोलवर जखम झाली होती. त्यानंतर ते नाल्यात पडून राहिले.
काही वेळाने नागरिकांनी त्यांना तुमसर रुग्णालयात नेले. ही वार्ता शहरात पसरताच नागरिक रुग्णालयात धावून गेले. जखमेतून रक्तस्त्राव सुरु होता. स्थानिक डॉक्टरांनी उके यांच्यावर प्राथमिक उपचार करुन सात टाके लावले. त्यानंतर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
प्राथमिक तपासणीनंतर त्याच दिवशी नगरसेवक प्रशांत उके यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. घरी चार दिवस विश्रांती घेतल्यावर जखमीच्या तीव्र वेदना नगरसेवक प्रशांत उके यांना जाणवू लागल्या होत्या. त्यामुळे उके यांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल १९ दिवस त्यांच्यावर निष्णात डॉक्टरांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न केले. परंतु जखम शेवटपर्यंत वाढत गेली. मधुमेहाच्या आजारात जखम लवकर भरत नाही. त्याचा फटका उके यांना बसला. शेवटी त्यांची मृत्यूशी झुंज संपली. या प्रकरणातील पाच आरोपींना तुमसर पोलिसांनी अटक केली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
प्रथमदर्शी साधी जखम मृत्यूला कारणीभूत ठरली. जिथे उके यांच्यावर हल्ला झाला तिथे ते दूषित पाण्यात पडून राहिले. पाणी जखमेत शिरले. मधुमेहामुळे ती जखम आणखी वाढली. जखमेचा परिणाम शरीरातील अंतर्गत अवयवांवर झाला.
शेवटपर्यंत ते संभाषण करीत होते. शेवटच्या तीन दिवसापूर्वी प्रकृती चिंताजनक झाली. शरीरावर सूज आली होती. हैद्राबाद येथे उपचाराकरिता नेणार होते. परंतु तत्पूर्वीच प्राणज्योत मालवली.
हल्लेखोरांनी नगरसेवक उके यांच्यावर प्राणघातक हल्ला का केला याचा सखोल तपास सुरु आहे. हल्लेखोरांची नावे सांगितल्यामुळे २४ तासात दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर चार दिवसात तिघांना अटक करण्यात आली. वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे तुमसर पोलिसांचे म्हणने आहे. शांत डोक्याने हत्येचा कट रचण्यात आला होता. तीन दिवसापूर्वी चुल्हाड येथेही अशाच प्रकारातून प्रकाश पारधी या सैन्याचा खून झाला होता. (तालुका प्रतिनिधी)