दातृत्वाचा आर्थिक कणा बनली दत्तक विद्यार्थी योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:35 IST2021-03-31T04:35:51+5:302021-03-31T04:35:51+5:30
आता सातव्या वर्षात प्रवेश केला आहे. शाळा स्तरावर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाला उत्स्फूर्त समाजातील व्यक्तींचा मोठा सहभाग मिळत आहे. नववीत ...

दातृत्वाचा आर्थिक कणा बनली दत्तक विद्यार्थी योजना
आता सातव्या वर्षात प्रवेश केला आहे. शाळा स्तरावर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाला उत्स्फूर्त समाजातील व्यक्तींचा मोठा सहभाग मिळत आहे. नववीत विद्यार्थी असताना दत्तक निवडीची प्रक्रिया सुरू केली जाते. दहावीच्या अभ्यासक्रमावर लेखी परीक्षा व मुलाखत तंत्राद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते. निवड होऊन दहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा एका वर्षाचा आर्थिक खर्च समाजातील व्यक्ती उचलत असतात. २०२१-२०२२ या वर्षी
होणाऱ्या दत्तक विद्यार्थी निवड परीक्षेत ५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेला २५ मार्चपासून प्रारंभ करण्यात आला आहे.
समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, उद्योजक, खासगी कंपनी व आस्थापनांना सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून ‘विद्यार्थी दत्तक योजना २०२१-२०२२’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार बांते, शाळेतील शिक्षक हंसराज भडके, हेमराज राऊत, शोभा कोचे, गजानन वैद्य, सिंदपुरे, शिखा सोनी, मोहन वाघमारे, लीलाधर लेंडे, श्रीहरी पडोळे यांनी केले. एका विद्यार्थ्याचे वार्षिक शैक्षणिक पालकत्व घेता येणार आहे. शाळा समाजापर्यंत पोहचावी, समाजाचा सहभाग वाढावा या हेतूने नावीन्यपूर्ण दत्तक विद्यार्थी योजना सुरू करण्यात आली. सहा वर्षात आतापर्यंत ४४ विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी दत्तक घेतले आहे. गेल्या सहा वर्षात ३९ मुलींना व पाच मुलांना या उपक्रमाने बळ दिले आहे. या मुलांच्या जिद्दीला बळ देण्यासाठी दानशूर व्यक्तींनी चांगला प्रतिसाद दिला. समाजाशी असलेल्या नात्याला अनोखा अर्थ देण्याची ही संधी समाधान देणारी आहे.
बॉक्स
मुलींची उंच भरारी
मागील शैक्षणिक सत्रात अकरा मुली दत्तक विद्यार्थी योजनेत सहभागी झाल्या होत्या. यातील पाच मुली मेरिटमध्ये आल्या तसेच उर्वरित सहा दत्तक मुलींनी प्रावीण्य सूचित स्थान मिळविले होते. शाळेने प्रथमच शंभर टक्के निकाल दिला. शैक्षणिक क्षेत्रात ग्रामीण मुलीही पुढे आहेत हे पुन्हा एकदा मुलींनी सिद्ध केले. संस्थेचे पाठबळ व शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या एकीच्या बळाने समाजातील लोकांच्या मदतीने दत्तक विद्यार्थी योजना साध्य होत असल्याने या उपक्रमाने विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव व प्रेरणा मिळत असल्याची माहिती मोहगाव देवी येथील महात्मा जोतिबा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक राजकुमार बांते यांनी दिली.