प्रशासकीय अधिकारी घडविण्याचा वसा!
By Admin | Updated: February 22, 2016 01:02 IST2016-02-22T01:02:09+5:302016-02-22T01:02:09+5:30
सद्यास्थितीत विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सर्वप्रथम स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते.

प्रशासकीय अधिकारी घडविण्याचा वसा!
शिवाजी विद्यालयात मिशन आयएएस : दर महिन्याला घेतली जाते परीक्षा
हरिश्चंद्र कोरे विरली (बु.)
सद्यास्थितीत विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सर्वप्रथम स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते. ही बाब हेरुन आणि भविष्यात आपल्याही शाळेतील एखादा विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी म्हणून निवळावा या उद्देशाने लाखांदूर तालुक्यातील ईटान येथील शिवाजी विद्यालयात मिशन आय.ए.एस. राबविला जात आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या विद्यालयात इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतचे वर्ग असून २४४ मुले आणि २३८ मुली असे एकूण ४८२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेने ५ जानेवारीला स्पर्धा परीक्षा प्रेरणा शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. पंजाबराव देशमुख आय.ए.एस. अकादमी अमरावतीचे संचालक डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी अगदी सहजसोप्या पध्दतीने आयएएस अधिकारी होणे कसे शक्य आहे? हे विद्यार्थ्यांना पटवून देवून ग्रामीण विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास जागृत केला आणि त्यांना प्रेरीत केले. याप्रसंगी डॉ. काठोळे यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना स्पर्धा परीक्षांविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती घालविण्यासाठी शाळेत मिशन आयएसएस राबविण्याचे आवाहन केले.
या शिबिरातून विद्यार्थ्यांना मिळालेला आत्मविश्वास आणि त्यांचा उत्साह कमी होण्यापुर्वीच शाळेचे मुख्याध्यापक बी. जी. कोटरंगे यांनी शाळेत मिशन आयएएस राबविण्याचा संकल्प केला. यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांच्या बैठकीचे आयोजन करुन मिशन आयएएसचे नियोजन करण्यात आले. या मिशनची जबाबदारी येथील उपक्रमशील शिक्षक रामदास बेदरे यांच्याकडे सोपविण्यात आली.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दर महिन्याला ३० प्रश्नांची एक प्रश्नपत्रिका घरुन सोडवून आणायला दिली जाते. या प्रश्नपत्रिकेत सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल आदी क्रमांक पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्नांचा समावेश असतो.
महिनाभरानंतर ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून घेतली जाते. या परीक्षेत पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक गटातून प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस दिली जातात.
जानेवारी महिन्यात घेतलेल्या परीक्षेत माध्यमिक गटातून शारदा अशोक वैलथरे, गौरी प्रल्हाद विधाते, रुपाली देवीदास दुधकुवर तर पूर्व माध्यमिक गटातुन कुणाल नरेंद्र लेदे, प्राची वाल्मीक राऊत, शुभम गोवर्धन कुथे यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून स्पर्धा परीक्षा विषयी विद्यार्थ्यांच्या मनात गोडी निर्माण होत असल्याचे चित्र आहे.