अतिरिक्त शिक्षक म्हणतात, दिवसच ढकलायचे आहेत
By Admin | Updated: June 12, 2017 00:33 IST2017-06-12T00:33:02+5:302017-06-12T00:33:02+5:30
खासगी अन् जिल्हा परिषद शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची स्थिती तळ्यात मळ्यात झाली आहे.

अतिरिक्त शिक्षक म्हणतात, दिवसच ढकलायचे आहेत
व्यथा : सकारात्मक विचारांची गरज
राजू बांते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : खासगी अन् जिल्हा परिषद शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची स्थिती तळ्यात मळ्यात झाली आहे. विशेषत: खासगी शाळांतील शिक्षकांच्या मनातील नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आता पुढील दिवस ढकलायचे आहेत. या प्रतिक्रियेतून अतिरिक्त शिक्षक व्यथित झाल्याचे दिसून येत आहे.
शिक्षण क्षेत्रात खुली स्पर्धा सुरु केली आहे. इंग्रजी शाळांची वाढती संख्या, स्वयं अर्थसहाय्यीत शाळा, लहान परिवाराची वाढती संस्कृती, विकतच्या शिक्षणाला महत्व, इंग्रजीतून शिक्षण घेणे लाभदायक आदी बाबींमुळे मराठी शाळा ओस पडायला लागली आहेत. पटसंख्या दिवसागणिक कमी होत चालली आहे. स्वाभाविकच दरवर्षी अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येत भर पडत आहे. त्यातही रिक्त पदांची संख्या कमी. यामुळे अतिरिक्त शिक्षकांची अवस्था घर का न घाट का अशी अवस्था झाली आहे. अतिरिक्त शिक्षकांना सोसावा लागणारा मानसिक ताण नकारात्मक विचाराकडे नेत आहे. त्यांच्या व्यथीत मनातून आपसुकच बाहेर पडते, आता दिवस असेच ढकलायचे आहेत. काही शिक्षक स्वेछानिवृत्ती घेतलेली बरी असेही मानसिक त्रासातून निर्माण झालेल्या प्रतिक्रिया उमटवत आहेत. अशाच काही अतिरिक्त शिक्षकांनी लोकमतजवळ प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
सूर्याचे परिवर्तन होते. त्यामुळेच दिवस रात्र होत असते. दिवस पुढे आपोआप ढकलत जातात. त्याला कोणाची आवश्यकता नसते. पण, दिवस ढकलत म्हणायची शिक्षकांवर का वेळ आली याचेही आत्मपरिक्षण केले जावे. यात सगळा दोष शिक्षकांवर जात नाही. शासनाची शैक्षणिक धोरणही याला जबाबदार आहेत. पण,दुसऱ्यांकडे निर्देश करून आपला दोष झाकायचा हा प्रयत्न करणे चुकीचे आहे. शिक्षण क्षेत्रातील खुल्या स्पर्धेत आपणमागे पडतो काय? हा प्रश्न प्रत्येक शिक्षकांनी स्वत:ला करावा. शासनातर्फे शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविण्यासाठी विविध प्रयोग करीत आहे. त्यात शिक्षण १०० टक्के समरस होत नाही. मग तो प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र (माध्य), स्व.मुल्यमापनाची शाळा सिद्धी मनावर घेत नाही. त्या दिशेने काम करीत नाही. आपण स्पर्धेत कमी पडत आहोत हे सत्य स्वीकारले पाहिजे. कुठे कमी आहोत याचे संशोधन व्हावे. सकारात्मक विचार ठेवावा. जिल्ह्यात खेड्यात उत्कृष्ट शाळा निर्माण केली जावू शकते. याचा विचार व्हावा. खराशी शाळेने केले, कुमठे बिट आणि अनेक शाळा आहेत जिथे अतिउत्कृष्ट शिक्षण मिळते. खुल्या स्पर्धेत टिकविण्यासाठी दोन पाऊल पुढे जाण्यासाठी सर्व स्तरावर आदर्श ठरण्याचे प्रयत्न झाले पाहिजे. निर्धाराने, नेटाने पुढे गेले पाहिजे. इंग्रजी शाळांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आधी गुणवत्ता, प्रबळ मानसिकता, ध्यास, त्याग, जिद्दीची गरज आहे. खासगी शाळेतील गुणवान शिक्षक आहेत. इंग्रजी शाळेला टक्कर देण्यासाठी सक्षम आहेत. त्यासाठी तयारी हवी, मानसिकता तयार करण्याची, मुलांसाठी पूर्ण उर्जा खर्च करण्याची, गुणवत्तेसाठी जे जे शक्य असेल ते १०० टक्के प्रयत्न करण्याची. दिवस ढकलायच्या नकारात्मक विचाराने पीडित राहणार आहोत तर पालक मराठी शाळेत शिकायला पाठविणार आहे. शासनाच्या धोरणामुळे अतिरिक्त झालो, तरीही आपली नोकरी सुरक्षित आहे हे महत्वाचे. कुठेही जावू या लाथ मारून पाणी काढण्याची क्षमता आमच्यात आहे हे दाखवून देण्यासाठी शिक्षकांनी विचार करावा. रिक्त अतिरिक्तचा खेळ चालतच राहणार, पण माझ्या शाळेतील एकही शिक्षक अतिरिक्त होणार नाही यासाठी गुणवत्तेचे पॅटर्न राबविले गेले पाहिजे.