कृषिपंप चोरणारी टोळी सक्रिय
By Admin | Updated: October 9, 2014 22:56 IST2014-10-09T22:56:44+5:302014-10-09T22:56:44+5:30
निर्सगाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या अडचणीत शेतपिकांच्या नुकसानीबरोबर शेतावर लावलेले मोटारपंप व पाईप चोरीला जात असल्याने बळीराजाचे टेंशन वाढले आहे.

कृषिपंप चोरणारी टोळी सक्रिय
गस्त नाही : वर्षभरात शेकडो मोटारपंपांची चोरी
वरठी : निर्सगाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या अडचणीत शेतपिकांच्या नुकसानीबरोबर शेतावर लावलेले मोटारपंप व पाईप चोरीला जात असल्याने बळीराजाचे टेंशन वाढले आहे. वर्षभरापासून मोटारपंप चोरणारी टोळी परिसरात सक्रिय असून गावातील चोरांचा यात सहभाग असल्याचे बोलले जात आहे. कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.
वरठीच्या सभोवताल सोनुली, बोथली, सीरसी, पांजरा, मोहगाव, पाचगाव, एकलारी, बिड व पांढराबोडी आदी गावे आहेत. या भागात पाण्याचे साधन मुबलक प्रमाणात नसल्यामुळे पीक उत्पन्न कमी होते. पाण्यावर अवलंबून असणारे भातपीक मोठया प्रमाणात पीकवितात. नहराचे पाणी येथे पोहचत नाही. म्हणून अनेक शेतकऱ्यांनी उधार उसणे घेवून शेतावर मोटारपंप बसवले आहेत. आता गावातील चोराची यावर नजर गेली आहे. वर्षभरापासून शेतावर लावलेले मोटारपंप, पाईप यासह शेतातील लोखंडी साहित्य चोरण्याचा सपाटा चोरांनी लावला आहे. सोनुली येथील सतिश वाघमारे, सदाशिव लेंडे, नंदकिशोर वाघमारे व शिवराज मरघडे यांच्या शेतावर लावलेले मोटारपंप महिन्याभरात चोरांनी उडवले. सतिश वाघमारे यांच्या शेतावरून एका महिन्यात दोन मोटार पंप आणि ट्रक्टरचे साहित्य लंपास करण्यात आले. वरठी व परिसरात चोरीच्या घटना नवीन नाहीत. गावात घरफोडी व लुटण्याच्या घटना नियमित घडल्या आहेत. आता चोरांनी आपला मोर्चा शेताकडे वळविल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. वेळेवर पाऊस न बरसल्यामुळे शेतपीक धोक्यात आले आहे. शेतपीकाला पाणी देण्यासाठी वापरणारे यंत्रही चोरीला जावू लागल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून चोराच्या उपद्रवामुळे संतापला आहे. वर्षभरात वरठी परिसरातील ५० च्यावर मोटारपंप चोरीला गेले असल्याची माहिती आहे. मोटारपंप चोरी गेल्याचे अनेक तक्रारी पोलिस चौकीत करण्यात आले. पण पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आलेले नाही. चोरी झालेले अनेक पंप हे जुने असल्यामुळे त्यांचे बिल शेतकऱ्याकडे नाहीत. (वार्ताहर)