सुदृढ लोकशाहीसाठी सक्रिय सहभाग आवश्यक
By Admin | Updated: January 26, 2016 00:33 IST2016-01-26T00:33:07+5:302016-01-26T00:33:07+5:30
लोकशाहीला पोषक करण्यासाठी सर्व मतदारांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.

सुदृढ लोकशाहीसाठी सक्रिय सहभाग आवश्यक
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम
भंडारा : लोकशाहीला पोषक करण्यासाठी सर्व मतदारांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने आजच्या स्मार्ट युगाचा विचार करून लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक पध्दतीत आमुलाग्र बदल केलेला आहे. जोपर्यंत लोकांची आस्था आहे, मतदान करायला लोक बाहेर पडतात, लोक जागरूक आहेत तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.
सामाजिक न्याय भवनात आयोजित राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, जी.जी. जोशी, सुनिल पडोळे, उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी, शिक्षणाधिकारी के.झेड. शेंडे, सहाय्यक आयुक्त डी.एन. धारगावे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, लोकशाहीचे जे तत्त्व आहे, त्याचा सध्या व्यवस्थित वापर होताना दिसत नाही. निवडणुकीत वाईट मागार्चा वापर हा कोणत्याही लोकशाहीसाठी घातक आहे. लोकशाही प्रक्रियेत बदल घडविण्यासाठी युवकांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे आणि निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘भारतीय सांसदीय लोकशाही कालबाह्य ठरली आहे किंवा नाही’ या विषयावर वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये जे.एम. पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम वनवे हा विषयाच्या बाजुने प्रथम तर जे.एम. पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिल चांदेवार हा विषयाच्या विरोधात प्रथम ठरला. ओम सत्यसाई महाविद्यालयाचा विद्यार्थी मयुर बांगरे हा विषयाच्या विरूद्ध बाजुने द्वितीय तर आठवले महाविद्यालायचा विद्यार्थी अमित रामटेके हा विषयाच्या विरोधात द्वितीय ठरला. यावेळी घोषवाक्य स्पर्धेत जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी पूनम खोकले, नंदिनी सोनवाने, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संजय भारसाकळे व अर्चना देशमुख विजयी ठरले. वादविवाद स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धेचे परिक्षण नीळकंठ रणदिवे, नंदकिशोर परसावार, मनोज दाढी यांनी केले.
लोकसभा व विधानसभा निवडणूक २०१४ च्या प्रक्रियेतील निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन या कार्यक्रमात लावण्यात आले होते. या प्रदर्शनामुळे नवमतदारांना निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सुधारित मतदार यादीचे वाटप करण्यात आले. १८ वर्षावरील नवमतदारांना मतदार ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी उपस्थितांना शपथ दिली. प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी विजय उरकुडे यांनी केले. संचलन तहसिलदार सुशांत बनसोडे यांनी तर आभारप्रदर्शन नायब तहसिलदार थोरवे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)