लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोणत्याही शासकीय कार्यालयात जनतेच्या सेवेला प्राधान्य देणे अपेक्षित आहे. मात्र, काही शासकीय कार्यालयांमध्ये या वेळेत वाढदिवस साजरा करणे, केक कापणे, चहा-नाश्ता आणि फोटोसेशन यांसारख्या वैयक्तिक कार्यक्रमांना प्राधान्य दिले जात असल्याचे प्रकार वाढत आहेत. हे प्रकार आता केवळ गुपचूप व मर्यादित राहत नसून खुलेपणाने व कार्यालयीन वेळेत साजरे केले जात असल्याने, प्रशासनाच्या नियमांनाच सुरुंग लागत आहे.
राज्य शासनाने याबाबत कडक भूमिका घेत 'महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९'च्या अनुषंगाने परिपत्रक जारी केले आहे. कार्यालयीन वेळेत, कार्यालयीन जागेवर वैयक्तिक समारंभ घेणे, हा शिस्तभंग मानला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कार्यालयांत वैयक्तिक समारंभ कशासाठी ?वाढदिवस ही वैयक्तिक गोष्ट आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने वाढदिवस साजरा करतो. त्यासाठी कार्यालयीन वेळ आणि कार्यालयीन स्थळाचा वापर हे नागरी सेवकांच्या आचारसंहितेला आणि जनतेच्या विश्वासाला तडा देणारे ठरते.
केक वाटून 'सेलिब्रेशन'वाढदिवसाच्या निमित्ताने एक-दोन विभाग नव्हे, तर संपूर्ण कार्यालयात केक वाटले जातात. परिणामी, काही काळ कामकाज ठप्पच होते. महिन्यात तीन, चार वाढदिवस असल्यास शासकीय कामकाज प्रभावित होते.
महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम काय म्हणतो ?या नियमानुसार, कोणताही सरकारी कर्मचारी कार्यालयीन वेळ आणि ठिकाणी अशासकीय, वैयक्तिक, धार्मिक वा सामाजिक कार्यक्रम आयोजित करू शकत नाही. नियम क्रमांक ४, ५ व २२ अंतर्गत कर्मचाऱ्यांकडून शिस्तबद्ध, पारदर्शक आणि लोकाभिमुख वर्तणूक अपेक्षित आहे. कामाच्या वेळेतच मोठ्या उत्साहात केक कापला जातो. कर्मचारी तासाभरासाठी काम बाजूला ठेवतात. काही ठिकाणी संगीत आणि मोबाइल व्हिडीओ शूटिंगही सुरू असते.