महिनाभरात ३०५ वाहनधारकांविरुध्द कारवाई
By Admin | Updated: July 6, 2015 00:36 IST2015-07-06T00:36:05+5:302015-07-06T00:36:05+5:30
शहरातील गजबजलेल्या व वर्दळीच्या मार्गावर बेशीस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी

महिनाभरात ३०५ वाहनधारकांविरुध्द कारवाई
४५ हजारांचा दंड वसूल : बेशिस्त वाहन चालकांना लगाम, पार्किंगसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज
भंडारा : शहरातील गजबजलेल्या व वर्दळीच्या मार्गावर बेशीस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलीस विभागातर्फे ३ जून पासून विशेष मोहीम राबविली जात आहे.
या अंतर्गत महिन्याभरात ३०५ जणांवर कारवाई करण्यात आली. एकूण ४५ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. व्यापाऱ्यांचे अतिक्रमण, अरुंद रस्ते, सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी, तुरळक अपघात अशी एकूणच शहरातील रहदारीचे व वाहतूक व्यवस्थेचे चित्र आहे. शहरातील गांधी चौकापासून बसस्थानक परिसरापर्यंत मुख्य मार्ग गेलेला आहे. याच मार्गावर गांधी चौकात गुजरी यालाच छोटा बाजार असे संबोधले जाते. नगरपालिका, पोलीस ठाणे, जिल्हा बँक तसेच समोर किराणा व कापड बाजार आहे. या मार्गावर शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. बसस्थानक व जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य शासकीय कार्यालयामध्ये जाण्यासाठी याच मार्गाचा वापर केला जातो. शालेय विद्यार्थी, कर्मचारी व अन्य नागरिक याच मार्गाने मोठ्या प्रमाणात रहदारी करतात. मोठ्या बाजारापासून गांधी चौकापर्यंतच्या मार्गावर दुकाने असलेल्या व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. ग्रामीण भागातून तसेच शहरातून खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची या दुकानांमध्ये नेहमीच गर्दी असते. परंतु दुचाकी व कारने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना पार्कींगची व्यवस्था नसल्याने भर रस्त्यावर बेजबाबदारपणे वाहने अस्ताव्यस्त उभी करून ठेवली जातात. या प्रकारामुळे वाहतुकीची कोंडी व अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
यावर उपाययोजना म्हणून वाहतूक पोलीस विभागातर्फे ३ जून पासून विशेष मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. यात रस्त्यावर बेशीस्तपणे उभ्या ठेवल्या जाणाऱ्या वाहनांना जॅमर लावण्याची कारवाई करण्यात आली. तीन आसनी आॅटो व गाड्यांना जॅमर लावून चालकाकडून ५० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर रस्त्यावर आढळलेल्या दुचाकींना जॅमर लावण्यानंतर टोविंगची कारवाई करून दुचाकी चालकावर दीडशे रुपयांचा दंड आकारण्यात आला. वाहतूकीचा अडथळा व अपघात होईल अशा पद्धतीने रस्त्यावर वाहन उभे करून ठेवल्याप्रकरणी १०० रुपये दंड तर वाहन जप्त केल्याप्रकरणी ५० रुपये असा दीडशे रुपये दंड आकारण्यात आला.
वाहनचालकांच्या कागदपत्रांची तपासणी करून काही त्रुटी आढळल्यास अधिक दंड वसुल केल्या जात आहे. दोन पोलीस कर्मचारी या मोहीमेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. कंत्राटी तत्वावर वाहन उचलण्याचे काम दिले जात आहे. दुचाकी प्रमाणेच चारचाकी वाहनचालकांवरही अशा प्रकारची कारवाई होणे गरजेचे आहे. परंतु वाहतुक पोलीस विभागाकडे क्रेनची व्यवस्था नाही.
अपघातग्रस्त वाहने उचलण्यासाठी सातत्याने पत्रव्यवहार करून गृहविभागाकडे क्रेनची मागणी करण्यात आली. दोन वर्षापासून ही मागणी पूर्ण झालेली नाही. टोविंगची कारवाई करण्यापूर्वी शिट्टी वाजवून चालकांना पूर्व सूचना दिली जाते. परंतु तरीही दुर्लक्ष करणाऱ्या चालकांची वाहने उचलली जातात. काही दिवसांचा अपवाद वगळता संपूर्ण वर्षभर ही मोहीम राबविली जाणार आहे. वाहने उचलण्याची कारवाई सुरु झाल्यामुळे रस्त्यावर वाहने उभी करून ठेवणाऱ्या नागरिकांमध्ये बरीच सुधारणा झाल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)
शहरात पार्किंगचा अभाव
शहरातील मुख्य बाजारपेठेत कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. या मार्गावर मोठे मोठे व्यापारी संकुले आहेत. खासगी इमारती, बँका व सरकारी कार्यालयासाठी ही संकुले भाड्याने दिली आहेत. परंतु एकाही ठिकाणी पार्कींगची व्यवस्था नाही. येथे येणारे नागरिक आपली वाहने सुरक्षितपणे उभी ठेवण्यासाठी जागा नसल्याने ती वाहने रस्त्यावर उभी ठेवतात. त्यानंतर अशा वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई करीत आहेत. कारवाईनंतर व्यापारी या विषयावर ब्र सुद्धा काढत नाही. मग वाहनचालकांनी वाहने कुठे ठेवावी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या मार्गावर स्वत: नगरपालिकेमार्फत बीओटी तत्वावर बांधलेले व्यापारी संकुल आहे. तिथेही वाहनतळ नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्या काळात बेधडक अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मोठ्या बाजारातील शंभर मिटरच्या परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले होते. या जागेवर पार्कींगची व्यवस्था झाल्यास नागरिकांना सोईचे झाले असते. परंतु पालिकेच्या अनास्थेमुळे ही समस्या अद्याप कायम आहे. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी वाहतूकीची होणारी कोंडी सोडविण्यासाठी कोणते प्रयत्न करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.