कामात हयगय केल्यास कारवाई
By Admin | Updated: June 4, 2016 00:21 IST2016-06-04T00:21:57+5:302016-06-04T00:21:57+5:30
जलयुक्त शिवार २०१५-१६ मध्ये घेण्यात आलेल्या भंडारा तालुक्यातील माटोरा, कवलेवाडा, खुर्शीपार आणि रावणवाडी या गावातील कामांची पाहणी

कामात हयगय केल्यास कारवाई
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जलयुक्त शिवार अभियान कामांची पाहणी
भंडारा : जलयुक्त शिवार २०१५-१६ मध्ये घेण्यात आलेल्या भंडारा तालुक्यातील माटोरा, कवलेवाडा, खुर्शीपार आणि रावणवाडी या गावातील कामांची पाहणी गुरुवार रोजी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केली. यावेळी माटोरा येथील माजी मालगुजारी तलावाचे काम सुरू न करणाऱ्या कृषी सहाय्यकाची वेतनवाढ रोखण्याचे निर्देश जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिले.
रणरणत्या उन्हात जिल्हाधिकाऱ्यांनी माटोरा गावातील मामा तलावातील गाळ काढणे, २ सिमेंट नालाबाध, २ नाला खोलीकरण आणि १५ सिंचन विहिरींचे कामाची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मग्रारोहयो अंतर्गत सुरू असलेल्या मामा तलावातील गाळ काढण्याच्या कामावरील मजुरांशी त्यांनी चर्चा केली. गाळ काढणे कठीण असून याकामात कमी मजुरी निघते अशी तक्रार यावेळी उपस्थित महिला मजूरांनी केली.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अंदाजपत्रकात बदल करण्याच्या सूचना दिल्या. गावातील नागरिकांकडे खुप जूने रेशनकार्ड असल्यामुळे त्यामध्ये नाव काढणे किवा टाकणे शक्य होत नाही. त्यामुळे नवीन रेशन कार्ड बनवून देण्याची मागणी केली. गावाचे सर्वेक्षण करुन सर्वांचे रेशनकार्ड अद्ययावत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी संपत खिलारी यांना दिले आहेत. त्यानंतर नाला खोलीकरणाच्या कामावर उपस्थित मजूरांशीही त्यांनी चर्चा केली.
यावेळी कामावर उपस्थित असलेली वयोवृध्द महिला मजूर श्रीमती शिंगाडे यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या. सदर महिला निराधार असून तीला कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नसल्याचे तिने सांगितले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर महिलेला संजय गांधी निराधार योजना व घरकुल योजनेच्या प्रतिक्षा यादीत समाविष्ट करण्याच्या सूचना ग्रामसेवकाला दिल्यात. कवलेवाडा येथील मामा तलावाचे कामाची पाहणी तसेच सिमेंट नालाबाधाच्या कामाची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
खुर्शीपार येथील मग्रारोहयो अंतर्गत सुरू असलेले मामा तलावातील गाळ काढण्याचे काम, कृषी विभागांतर्गत बांधण्यात आलेला सिमेंट नालाबंधारा आणि वन विभागांतर्गत बांधण्यात आलेलया वनतलावाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समेवत उपजिल्हाधिकारी सुनिल पडोळे, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, गटविकास अधिकारी मंजुषा ठवकर, लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता गुप्ता, कृषी विभागाचे अधिकारी, सरपंच, ग्राममसेवक, ग्रामरोजगार सेवक, तलाठी, ग्रामस्थ उपस्थित होते (नगर प्रतिनिधी)