रेतीचा उपसा प्रकरणी ‘पोकलँड’वर कारवाई
By Admin | Updated: April 30, 2015 00:42 IST2015-04-30T00:42:56+5:302015-04-30T00:42:56+5:30
करडी पोलिसांनी खडकी व मुंढरी येथील रेतीची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून कारवाई केली. ते दोन्ही ट्रॅक्टर भाजप कार्यकर्त्यांचे होते.

रेतीचा उपसा प्रकरणी ‘पोकलँड’वर कारवाई
आमदारांचा तासभर ठिय्या : मोहाडी तहसीलदार व पोलिसांची कारवाई
करडी (पालोरा) : करडी पोलिसांनी खडकी व मुंढरी येथील रेतीची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून कारवाई केली. ते दोन्ही ट्रॅक्टर भाजप कार्यकर्त्यांचे होते. त्यामुळे आमदार चरण वाघमारे यांनी करडी चौकीत दुपारी तास भर ठिय्या मांडून लिलाव झालेल्या घाटावर बेकायदेशिरपणे चालविल्या जाणाऱ्या जेसीबी व पोकलँड मशनीवरही कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार मोहाडी तहसिलदार व पोलिसांनी कारवाई करित कान्हळगाव मुंढरी घाटावरून पोकलँड ताब्यात घेतली. ही कारवाई मंगळवारी, सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान करण्यात आली.
सकाळी आ. चरण वाघमारे करडी येथे जलशिवार योजनेच्या शुभारंभासाठी आले होते. करडी पोलिसांनी मुंढरी व खडकी येथील भाजप कार्यकर्त्यांचे रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडून करडी चौकीसमोर जमा केले. पोलिसांना ट्रॅक्टर सोडण्यासाठी भाजपच्या एका नेत्याने सांगितले. मात्र ते ऐकले नाहीत. आ. वाघमारे यांना ही हकीकत माहित होताच ते मोहगाव वरून परत करडी चौकी येथे येवून तासभर ठिय्या मांडला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना बेकायदेशिरपणे रेती घाटात जेसीबी व पोकलँड कशी लावली जात आहे, त्यांचेवर तत्काळ कारवाई करा, असे सूचना दिल्या.
आ. वाघमारे यांचे सूचनेनुसार सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तहसिलदार धोटे यांचे मार्गदर्शनाखाली कान्हळगाव रेती घाटावरून पोकलँड जप्त केली. करडी पोलीस चौकीसमोर जमा करण्यात आली. कारवाई करतेवेळी मोहाडीवरून पोलिसांची चमू बोलविण्यात आली होती. कारवाईमुळे परिसरातील बेटाळा, ढिवरवाडा घाटावरील कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे. (वार्ताहर)