चार पोलिसांवर कारवाई
By Admin | Updated: September 29, 2014 00:37 IST2014-09-29T00:37:07+5:302014-09-29T00:37:07+5:30
बंदूक हाताळताना हलगर्जीपणा करणाऱ्या तुमसर येथील चार पोलिसांवर कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली प्रत्येकी एक हजारांचा

चार पोलिसांवर कारवाई
प्रकरण बंदूक हयगयीने हाताळण्याचे : एक हजाराचा दंड, कारणे दाखवा नोटीस
तुमसर : बंदूक हाताळताना हलगर्जीपणा करणाऱ्या तुमसर येथील चार पोलिसांवर कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली प्रत्येकी एक हजारांचा दंडही ठोठावला आहे. या चारही पोलिसांना तडकाफडकी पोलीस मुख्यालयात रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.
तुमसर पोलीस ठाण्यातील प्रकाश बोकडे, रमेश बेदुरकर, शरद गिऱ्हेपुंजे व सुधीर कळमकर या पोलीस कर्मचाऱ्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक कैलास कणसे यांनी बंदूक हाताळताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून ही कारवाई केली. दि. १७ सप्टेंबर रोजी तुमसर ठाण्यातील चार पोलीस कर्मचारी भंडारा येथे सायंकाळी ६.३० वाजता तुमसरहून इव्हीएम मशीन आणण्यासाठी गेले होते. भंडाऱ्याहून मशीन घेऊन त्यांना परत यायचे होते. मशीनची तपासणी झाल्यानंतर मोजणी करण्यात आली. ही कामे होण्याकरिता रात्र उलटली. सकाळी साहित्य घेऊन तुमसर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत चारही पोलीस पोहचले. आय.टी.आय. मध्ये वेगळी गार्ड रुमची व्यवस्था नव्हती. त्यामुळे पोलिसांनी बंदुका स्वत:जवळच ठेवल्या होत्या. सकाळी ११.३० च्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक कैलास कणसे यांनी आय.टी.आय.ला भेट दिली. तेव्हा बंदुकी भिंतीला टेकून ठेवलेल्या होत्या व पोलीस तिथेच होते. पोलीस अधीक्षक कणसे यांनी बंदुकी हयगयीने हाताळणीबाबत विचारणा केली. अप्रिय घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असे विचारले. त्यामुळे पोलिसांच्या हयगयीप्रकरणी कारवाई का करण्यात येऊ नये? असे ठणकाविले. चौघांनीही आपली बाजू मांडली. कणसे यांनी त्यांना दोषी माणून एक हजारांचा दंड व कारणे दाखवा नोटीस बजावली व पोलीस मुख्यालयात रूजू होण्याचे आदेश दिले. तत्पूर्वी चौघांनीही तहसीलदार सचिन यादव यांना भ्रमणध्वनीवर बंदुकीकरिता गार्ड रुम उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी गार्डरुम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी झटकली व स्थानिक प्राचार्यांशी संपर्क करा असे सांगितले. पोलिसांनी प्राचार्यांशी चर्चा केली तेव्हा सायंकाळी पाच पर्यंत माझे कार्यालय सुरु आहे. त्यानंतर तुम्ही या खोलीचा उपयोग करू शकता असे सांगून दुसरी गार्ड रुम उपलब्ध करून दिली नाही. नियमानुसार बंदुक पोलिसांना उपलब्ध झाल्यावर त्याकरिता गार्डरुमची व्यवस्था पूर्वीच करणे बंधनकारक असते. परंतु ती व्यवस्था येथे नव्हती. त्यामुळे या पोलिसांवर कारवाई कोणत्या नियमानुसार करण्यात आली असा प्रश्न उपस्थित होतो. (तालुका प्रतिनिधी)