उत्पादन शुल्कच्या कारवाईने मद्यविक्रेते धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:35 IST2021-03-31T04:35:31+5:302021-03-31T04:35:31+5:30
भंडारा : राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने शासनाने बार व रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ रात्री ८ वाजताची ठरवून ...

उत्पादन शुल्कच्या कारवाईने मद्यविक्रेते धास्तावले
भंडारा : राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने शासनाने बार व रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ रात्री ८ वाजताची ठरवून दिली आहे. मात्र तरीदेखील भंडारा शहरात काही बार व रेस्टाॅरंट सुरू असल्याची माहिती मिळताच भंडारा राज्य उत्पादन शुल्क विभाग व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित कारवाई केली. या कारवाईची माहिती होताच शहरातील इतर बार, रेस्टाॅरंट मद्य विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, या कारवाईची शहरात चर्चा होत आहे.
भंडारा शहरातील राजीव गांधी चौकातील एका बार अँड रेस्टाॅरंटवर मद्यविक्री होत असल्याची माहिती मिळताच, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक शशिकांत गर्जे व निरीक्षक र.दा. पाटणे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी यांनी एकत्रित ही कारवाई केली. भंडारा तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलत, विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भंडारा शहरात सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याची प्रशासनाने सूचना दिली आहे. तसेच शहरातील बार व रेस्टाॅरंट हे रात्री ८ वाजेपर्यंतच सुरू राहतील, असे सांगूनही काही मद्यविक्रेते होळीचा सण असल्याने मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आले होते. याची तात्काळ दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील विविध भागात कारवाया केल्या. यापुढेही वेळेचे उल्लंघन केल्यास विभागाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशांचे वेळोवेळी पालन करणे गरजेचे असून, यासाठी ठरवून दिलेल्या नियमावलीतच विक्री करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.
भंडारा शहरात बार व रेस्टाॅरंट बंद करण्याची रात्री ८ वाजताची वेळ ठरवून दिली आहे. यानंतरही कुणी विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येणार आहे. शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या सूचनांचे पालन सर्वांनी करावे.
-शशिकांत गर्जे,
अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भंडारा.