विनातिकीट प्रवास करणाऱ्या ६५ प्रवाशांवर दंडाची कारवाई
By Admin | Updated: January 16, 2016 00:46 IST2016-01-16T00:46:57+5:302016-01-16T00:46:57+5:30
नियमबाह्य व विनातिकीट प्रवास करणाऱ्या ६५ प्रवाशांना १५ हजारांचा दंड रेल्वे प्रशासनाने ठोठावला.

विनातिकीट प्रवास करणाऱ्या ६५ प्रवाशांवर दंडाची कारवाई
तुमसर रोड येथील प्रकार : रेल्वे प्रवाशांना १५ हजाराचा दंड ठोठावला
तुमसर : नियमबाह्य व विनातिकीट प्रवास करणाऱ्या ६५ प्रवाशांना १५ हजारांचा दंड रेल्वे प्रशासनाने ठोठावला. ही कारवाई तुमसर रोड रेल्वे स्थानकावर गुरूवारी दुपारी करण्यात आली. दर १५ ते २० दिवसातून येथे कारवाई करण्यात येते, परंतु रेल्वे प्रवासी यातून धडा घेत नाही.
तुमसर रोड रेल्वे स्थानकावर दुपारच्या सुमारास रेल्वे न्यायाधीश फड यांच्या मार्गदर्शनात रेल्वे सुरक्षा दलाचे प्रमुख माणिकचंद यांनी कारवाईला सुरूवात केली. प्रवासी गाडीत विनातिकीट प्रवास करणे, महिला प्रवासी डब्यातून पुरूष प्रवाशांनी प्रवास करणे, रेल्वे ट्रॅक ओलांडणे, रेल्वे फलाटावर विना तिकीट प्रवेश करणाऱ्या ६५ प्रवाशांवर कारवाई करून १५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
रेल्वे प्रवास सुरक्षित, नियमानुसार व तिकीट खरेदी करूनच करावा हा या कारवाई मागचा प्रमुख उद्देश आहे, असे नागपूर विभागीय रेल्वे सुरक्षा दलाचे प्रमुख माणिकचंद यांनी लोकमतला सांगितले.
ही कारवाई सुरक्षा दल प्रमुख माणिकचंद्र, स्थानिक सुरक्षा दलाचे कर्मचारी अमर ढबाले, एन.एन. झोडे, ईशांत दीक्षित, बोरकर, जितेंद्र वाघमारे यांनी केली. यावेळी रेल्वे कमेटी सदस्य आलमखान उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)