पाच महिन्यानंतर सापडले आरोपी
By Admin | Updated: August 4, 2015 00:25 IST2015-08-04T00:25:52+5:302015-08-04T00:25:52+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील गुंथारा फाट्यावरील नाल्यात १ मार्च रोजी दोन अनोळखी व्यक्तीचे मृतदेह आढळून आले.

पाच महिन्यानंतर सापडले आरोपी
प्रकरण खुनाचे : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
भंडारा : राष्ट्रीय महामार्गावरील गुंथारा फाट्यावरील नाल्यात १ मार्च रोजी दोन अनोळखी व्यक्तीचे मृतदेह आढळून आले. या घटनेचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने मृतांची ओळख पटवून तब्बल पाच महिन्यानंतर ओरीसा राज्यातील संबलपूर येथून तीन आरोपींना अटक केली.
१ मार्चला गुंथारा फाट्याजवळील नाल्यात दोन अनोळखी व्यक्तींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले. स्थानिकांच्या माहितीवरून कारधा पोलिसांनी घटनेची नोंद केली. तत्कालीन ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांनी घटनास्थळी जावून तपास सुरु केला. मृतदेह महामार्गाने जाणाऱ्या एखाद्या वाहनाचे चालक वाहक असावे एवढाच एक अंदाज असल्याने पोलिसांचा तपास रेंगाळत होता. मृतांना ठार मारण्यात आल्याचे उत्तरीय तपासणीतून सिद्ध झाले. यानंतर घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. दरम्यान १३ मार्च रोजी घटनास्थळाच्या परिसरात महामार्गाच्या बाजूला ट्रक क्रमांक ओ.डी. १५ बी ३१८७ बेवारस स्थितीत आढळून आला. पोलिसांनी ट्रक मालकांचा शोध घेतला तेव्हा ओडीसा राज्यातील संबलपूर येथील ट्रांसपोर्ट कंपनीची माहिती मिळाली. कंपनीच्या मालकाने सदर ट्रकमधून संबलपूर वरून हिराकुंड येथे १८ टन अॅल्युमिनियम प्लेटची वाहतूक करण्यात आली होती. त्यानंतर मृतक हे दोघेही ट्रांसपोर्ट कंपनीत काम करणारे चालक भोला उर्फ सतरू बरिहा आणि वाहक पिंटू प्रल्हाद बेहरा असल्याची ओळख पटली. मृतांची ओळख पटल्यावर याच कंपनीत काम करणारा सुरेंद्र पाटीया यांच्यासोबत मृतक चालकाची ओळख होती व तो त्याला भेटला असल्याची माहिती पोलिसांनी मिळविली. त्यानुसार सुरेंद्र पाटीया याने सूरजकुमार बिस्वास, हरजंदर पड्डा यांच्यासोबत गडेगाव शिवारात चालक व वाहकाचा खून करून ट्रकसह माल पळवून नेला. असे कबुल केले. ट्रकमधील माल नागपुरच्या एका कंपनीत विकण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. परंतु तो माल कुठे गेला याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आरोपींना ३१ जुलैला अटक केली. त्यांना १३ आॅगस्टपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधीक्षक दिलीप झलके, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक धुसर, सहायक पोलिस निरीक्षक गेडेकर, गावंडे, हवालदार प्रीतीलाल रहांगडाले, सुधीर मडामे, राजेश गजभिये, सावन जाधव, दिनेंद्र आंबेडारे, स्नेहल गजभिये रमाकांत बोंद्र, बबन अतकरी यांनी तपासात सहभाग घेतला. (नगर प्रतिनिधी)