जीर्ण वाचनालयाचा करारनामा नियमानुसार
By Admin | Updated: August 31, 2015 00:27 IST2015-08-31T00:26:24+5:302015-08-31T00:27:02+5:30
स्वातंत्र्यपूर्व काळातील नगरपरिषद विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाची इमारत जीर्ण झाली होती. इमारतीमुळे इमारतीखालील दुकानदारांचा जीव धोक्यात आला होता.

जीर्ण वाचनालयाचा करारनामा नियमानुसार
७५ वर्षांची जुनी इमारत : अभिषेक कारेमोरे यांची पत्रपरिषदेत माहिती
तुमसर : स्वातंत्र्यपूर्व काळातील नगरपरिषद विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाची इमारत जीर्ण झाली होती. इमारतीमुळे इमारतीखालील दुकानदारांचा जीव धोक्यात आला होता. नगरपरिषदेची उत्पन्न वाढ व सुरक्षितता लक्षात घेऊन लिलाव पद्धतीने निविदा काढून व २१ नगरपरिषद सदस्यांनी ठरावाला मंजुरी दिल्यावर करारनामा करण्यात आला, अशी माहिती नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी पत्रपरिषदेत दिली.
नगरपरिषदेसमोर स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाची जीर्ण इमारत आहे. या इमारतीला ७५ वर्षे झाली आहे. इमारतीखाली अस्थायी भाडेकरुंनी तत्कालीन मुख्याधिकारी ए.आर. सातपुते यांचेकडे पाणी गळण्याची तक्रार केली होती. माजी नगराध्यक्ष अमरनाथ रगडे यांचे कार्यकाळात नवीन सार्वजनिक वाचनालयाची इमारत तयार करण्यात आली होती. नवीन इमारतीत वाचनालयाचे स्थानांतरण आठ महिन्यापूर्वीच झाले. ९ जुलै २०१५ ला जाहीर लिलावाकरिता निविदा देण्यात आली. शासन निर्णयाप्रमाणे परिगणना तक्त्यानुसार ७५.४४ ची अधिमुल्य रक्कम (नपरतावा) ३,६८,००० निश्चित करण्यात आली. तथा त्याचे मासिक भाडे ५,२१४ रुपये ठरविण्यात आले. एवढी रक्कम आजपावेतो तुमसर नगरपरिषदेत ठरविली गेली नाही.
१७ जुलै रोजी नगरपरिषद सभागृहात लिलाव प्रक्रियेस सुरुवात झाली. यात नऊ लिलावधारक उपस्थित होते. त्यातून केवळ धारकांनी भाग घेतला. त्यांनी नियमाप्रमाणे २५ हजार प्रमाणे प्रत्येकांनी अमानत रक्कम भरली. यात केशव खोब्रागडे, शंकर निखाडे, देवेंद्र जवरानी, दिनेश जवरानी यांचा समावेश आहे. अंतिम बोली ३,७४,००० चे वर कुणीही बोली बोलली नही. त्यामुळे दिनेश जवरानी यांनी ३,७४००० मध्ये केवळ तीन वर्षाकरिता अस्थायी पट्यांवर इमारत देण्यात आली. ३,९९,००० नगरपरिषदेत जमा करण्यात आले. नगरपरिषद सर्वसाधारण सभेत २० जुलै रोजी ठराव क्रमांक ९ अन्वये २१ नगरपरिषद सदस्यांनी सर्वानुमते मान्यता दिल्यावर करारनामा कारवाई करण्यात आली. ४० लाखात इमारत विकल्याचा आरोप बिनबुडाचा व निराधार आहे. नियमानुसार ही सर्व कारवाई झाली असे नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला नगरपरिषद उपाध्यक्ष सरोज भुरे, मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे तथा नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)